कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीतील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नेमबाजी केंद्राचे उद्घाटन

रिओमध्ये जसे नेमबाजी केंद्र आणि वातावरण आहे त्याच धर्तीवर इथे तयार करण्यात आले आहे. जेणेकरून रिओमध्ये वातावरणाशी जुळवून घेणे सोपे होईल. अयोनिकाची तयारी आणि सराव योग्य दिशेने सुरू आहे. ऑलिम्पिकमध्ये सगळेच प्रतिस्पर्धी तुल्यबळ असतात. लंडन ऑलिम्पिकनंतर नियमांमध्ये बदल झाले आहेत. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन खेळणे आवश्यक आहे’, असे ‘लक्ष्य अकादमी’च्या संस्थापिका आणि अव्वल आंतरराष्ट्रीय नेमबाज सुमा शिरुर यांनी कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीतील नेमबाजी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले.

आमदार आणि कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीचे प्रमुख विवेकानंद पंडित यांच्या ६१व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नेमबाजी केंद्राचे उद्घाटन झाले. या वेळी तेजस्विनी सावंत, दीपाली देशपांडे, अनुजा जंग, ज्येष्ठ प्रशिक्षक संजय चक्रवर्ती, समीर आंबेकर, लीना शिरोडकर, विश्वजीत शिंदे, तेजस्विनी मुळ्ये यांच्यासह नेमबाजी क्षेत्रातली मान्यवर उपस्थित होती.

‘नेमबाजी एकाग्रतेचा खेळ आहे. शारीरिकपेक्षा मानसिक कणखरता महत्त्वाची असते. मात्र आजची पिढी मोबाइल, टीव्ही यांच्यासहच मोठी झाली आहे. सोशल मीडियाचा वापर कधी करायचा आणि कधी थांबवायचा याची त्यांना जाण आहे. याबाबतीत ते आमच्या पिढीपेक्षा स्मार्ट आहेत’, असे मत सुमा शिरुर यांनी व्यक्त केले.