आपल्या पहिल्याच ग्रँड स्लॅम स्पर्धेत फेडररला झुंज देणारा भारताचा टेनिसपटू सुमीत नागलचे US OPENमधील आव्हान संपुष्टात आले. २०१९च्या US OPENमध्ये सलामीच्या सामन्यात त्याने फेडररचा सामना केला होता. त्यात तो पराभूत होत स्पर्धेबाहेर गेला होता. त्यानंतर यंदा त्याने पुन्हा US OPENच्या मेन ड्रॉमध्ये प्रवेश केला आणि पहिली फेरी जिंकली पण दुसऱ्या फेरीत मात्र द्वितीय मानांकित डॉमनिक थीएमने त्याचा तीन सरळ सेटमध्ये पराभव केला.

सुमित नागलने US OPEN टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत विजय मिळवला होता. २३ वर्षीय सुमितने अमेरिकेच्या ब्रॅडली क्लॅनला नमवून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला होता. गेल्या सात वर्षात ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात दुसऱ्या फेरीत पोहोचणारा सुमीत हा पहिलाच भारतीय ठरला होता. दुसऱ्या फेरीत ऑस्ट्रियाच्या थीएमशी त्याचा सामना रंगला. पण थीएमच्या अनुभवापुढे नागलचा संघर्ष फिका पडला. ६-३, ६-३, ६-२ अशा सरळ सेटमध्ये नागलचा पराभव झाला. या पराभवासोबतच त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

सुमित नागल US OPEN स्पर्धेत दुसऱ्यांदा मूळ स्पर्धेपर्यंत (main draw) पोहोचला होता. मागच्या वर्षी नागलची सलामीची लढत २०वेळा ग्रँड स्लॅम विजेता असलेल्या रॉजर फेडररसोबत झाली होती. या सामन्यात पहिल्या सेटमध्ये फेडररला आव्हान देत त्याने ४-६ असा एक सेटही जिंकला होता. पण नंतरच्या तीनही सेटमध्ये नागलला पराभव स्वीकारावा लागला होता.