भारताचा टेनिसपटू सुमित नागल याने US OPEN टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत विजय मिळवला. २३ वर्षीय सुमितने अमेरिकेच्या ब्रॅडली क्लॅनला नमवून दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. जागतिक क्रमवारीत १२४व्या स्थानी असणाऱ्या सुमीत नागलने ब्रॅडलीला 6-1, 6-3, 3-6, 6-1 असे पराभूत केले. या विजयासह ७ वर्षात ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात दुसऱ्या फेरीत पोहोचणारा सुमीत हा पहिलाच भारतीय ठरला.

सात वर्षानंतर भारतीय टेनिसपटूने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. या आधी सात वर्षांपूर्वी सोमदेव देवबर्मनने अशी कामगिरी करून दाखवली होती.

नागलने क्लॅनविरुद्धच्या सलामीच्या पहिल्या दोन सेटमध्ये ६-१, ६-३ अशी आघाडी घेतली होती, पण तिसऱ्या सेटमध्ये क्लॅनने दमदार पुनरागमन केले आणि ३-६ असा सेट जिंकला. चौथ्या सेटमध्ये काय होणार याची साऱ्यांनाच उत्सुकता असताना नागलने आपले ठेवणीतील शॉट्स खेळत ६-१ असा सेट जिंकत सामना खिशात घातला.

सुमित नागल US OPEN स्पर्धेत दुसऱ्यांदा मूळ स्पर्धेपर्यंत (main draw) पोहोचला. मागच्या वर्षी नागलची सलामीची लढत २०वेळा ग्रँड स्लॅम विजेता असलेल्या रॉजर फेडररसोबत झाली होती. या सामन्यात पहिल्या सेटमध्ये फेडररला आव्हान देत त्याने ४-६ असा एक सेटही जिंकला होता. पण नंतरच्या तीनही सेटमध्ये नागलला पराभव स्वीकारावा लागला होता.

आता गुरूवारी सुमीतचा पुढचा सामना ऑस्ट्रियाच्या पाचव्या मानांकित डॉमिनिक थीएमसोबत होणार आहे.