पीटीआय, नवी दिल्ली

भारताचा टेनिसपटू सुमित नागल याला टोक्यो ऑलिम्पिकसाठी पुरुष एकेरीच्या गटात स्थान मिळाले आहे. अव्वल टेनिसपटूंच्या माघारसत्रामुळे नागलला आता देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

अखिल भारतीय टेनिस असोसिएशनने (एआयटीए) दिविज शरणचे नामांकन रद्द करत आता सुमितला रोहन बोपण्णाच्या साथीने पुरुष दुहेरीत स्थान दिले आहे. आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (आयटीएफ) नागलला पुरुष एकेरीत स्थान दिल्याचे ‘एआयटीए’ला कळवले आहे.

ऑलिम्पिकसाठी क्रमवारीनुसार थेट स्थान मिळवण्याची तारीख १४ जून होती, त्या वेळी नागल १४४व्या क्रमांकावर होता. गुरुवापर्यंत १३०व्या क्रमांकापर्यंतच्या खेळाडूंना स्थान दिल्यामुळे १२७व्या क्रमांकावरील युकी भांब्रीला ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. करोनाच्या कठोर नियमावलीमुळे अनेक खेळाडू ऑलिम्पिकमधून माघार घेत असल्याने सुमितचे स्थान निश्चित झाले आहे. १४८व्या क्रमांकावरील प्रज्ञेश गुणेश्वरनही संधीच्या प्रतीक्षेत आहे.

‘‘नागलच्या प्रवेशाबाबत आम्ही त्याच्याशी बोलणी केली असून त्याने खेळण्यास होकार दर्शवला आहे. त्यानंतर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनशी संपर्क साधून सुमितच्या पुढील प्रक्रियेविषयीची व्यवस्था करण्यास सांगितले आहे,’’ असे ‘एआयटीए’चे सरचिटणीस अनिल धूपर यांनी सांगितले.