News Flash

राष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्पद स्पर्धा : सुमीत संगवान अंतिम फेरीत

हाडे गोठवणाऱ्या थंडीतही नागपूरकरांना दमदार पंचेस आणि थरारक लढतींची पर्वणी अनुभवता आली. विभागीय क्रीडा संकुलात सुरू असलेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचा थरार आता अंतिम टप्प्यात

| January 14, 2015 01:42 am

हाडे गोठवणाऱ्या थंडीतही नागपूरकरांना दमदार पंचेस आणि थरारक लढतींची पर्वणी अनुभवता आली. विभागीय क्रीडा संकुलात सुरू असलेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचा थरार आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केलेल्या सुमीत संगवानने प्रतिस्पध्र्याचा सहज पाडाव करत लाइट हेवीवेट गटातून अंतिम फेरीत मजल मारली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या रेल्वेच्या अमनदीप सिंगनेही फ्लायवेट गटातून जेतेपदाच्या दिशेने कूच केली आहे.
गुरचरण सिंग, दिवाकर प्रसाद, मनोज कुमार यांसारखे ऑलिम्पियन बॉक्सर स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे सुमीत संगवान आणि अमनदीप सिंग यांच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष लागले होते. या दोघांनीही आपल्या चाहत्यांना निराश न करता अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश मिळवला. हरयाणाच्या सुमीतसमोर मध्य प्रदेशच्या राहुल पासीचे तगडे आव्हान होते; पण आंतरराष्ट्रीय स्पर्धाचा अनुभव पणाला लावून सुमीतने प्रतिस्पध्र्याला वरचढ होण्याची कोणतीही संधी दिली नाही. त्याने ३-० अशा फरकाने लढत जिंकून आगेकूच केली आहे. त्याला अंतिम फेरीत हिमाचल प्रदेशच्या गीता आनंदच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
रेल्वेच्या अमनदीपने पंजाबच्या मनोज कुमारचा अटीतटीच्या लढतीत २-१ असा पराभव केला. पहिल्या फेरीत सुरेख खेळ करत अमनदीपने वर्चस्व गाजवले. मात्र दुसऱ्या फेरीत दमदार पंचेस लगावून मनोजने अमनदीपला निष्प्रभ केले. तिसऱ्या फेरीत अमनदीपने मनोजला वरचढ होण्याची संधी दिली नाही. त्यामुळे पंचांनी अमनदीपच्या बाजूने कौल दिला. अन्य लढतीत, रेल्वेच्या सलमानने मिझोरामच्या लाल बियाक किमा याचे कडवे आव्हान २-१ असे परतवून लावले.

महाराष्ट्राचे आव्हान संपुष्टात
महाराष्ट्राकडून मृणाल भोसलेने उपांत्य फेरीपर्यंत आगेकूच केली होती; पण सेनादलाचा बलाढय़ खेळाडू दुर्योधन सिंगविरुद्धच्या लढतीत झुंज देत असताना दुर्योधनचे डोके मृणालच्या भुवईवर जोराने आदळले. त्यामुळे मृणालने पहिल्याच फेरीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. दादर नगर हवेलीकडून खेळणाऱ्या महाराष्ट्राच्या सिद्धार्थ वर्मा आणि प्रणीत कुंभार यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. वेल्टरवेट गटात सिद्धार्थला हरयाणाच्या राकेश कुमारने हरवले. लाइटवेट गटात प्रणीतने सेनादलाच्या मनजीत कुमारला विजयासाठी चांगलेच झुंजवले. मात्र अखेरच्या फेरीत स्टॅमिना कमी पडल्यामुळे प्रणीतला १-२ अशा हार स्वीकारावी लागली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2015 1:42 am

Web Title: sumit sangwan amandeep singh in finals of nationals boxing championships
टॅग : Boxing
Next Stories
1 अजमलची गोलंदाजी चाचणी चेन्नईत
2 पाकिस्तानी खेळाडूंसाठी मानसोपचार शिबीर
3 राष्ट्रीय स्पर्धेत खेळाल तरच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये संधी
Just Now!
X