करोना विषाणू संसर्ग जगभरात फोफावल्यामुळे लांबणीवर टाकण्यात आलेली टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा २०२१ मध्ये उन्हाळ्यात होण्याचे संकेत टोक्यो ऑलिम्पिक संयोजन समितीने दिले आहेत.
२०२०च्या टोक्यो ऑलिम्पिकप्रमाणे रचनात्मक योजना आखू. त्यात फारसा बदल नसेल, असे संयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मुरी यांनी दिले आहेत. ऑलिम्पिक स्पर्धा जून ते सप्टेंबर या कालावधीत होतील, असे जपानच्या ‘क्योडो’ या वृत्तसंस्थेने शनिवारी म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाख यांनी मंगळवारी स्वित्र्झलड येथून ऑलिम्पिक पुढे ढकलण्याची घोषणा केली. त्या वेळी ऑलिम्पिक हिवाळ्यात होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली होती.
ऑलिम्पिक स्पर्धा २४ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत होणार होत्या. करोनाच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर पडलेल्या या स्पर्धेच्या नव्या तारखा येत्या आठवडय़ात संयोजन समितीच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत निश्चित होण्याची दाट शक्यता आहे. टोक्यो ऑलिम्पिक संयोजन समिती, आयओसी, शेकडो पुरस्कर्ते, क्रीडा संघटना आणि प्रक्षेपण यंत्रणा यांच्या बैठकीत तारखांचा अंतिम निर्णय घेण्यात येईल.
ऑलिम्पिक स्पर्धा लांबणीवर पडल्यामुळे अनेक खेळाडूंनी आपला सराव स्थगित केला आहे. अनेक खेळाडूंपुढे सरावाशिवाय तंदुरुस्ती राखण्याचे आव्हान समोर उभे ठाकले आहे.
मुरी आणि संयोजन समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तोशिरो म्युटो या दोघांनीही म्हटले आहे की, ऑलिम्पिक स्पर्धा लांबणीवर पडल्यामुळे खर्च प्रचंड वाढला आहे. सुरुवातीच्या अंदाजानुसार हा खर्च मोठय़ा प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. टोक्यो ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी अंदाजित १२.६ अब्ज डॉलर्स खर्च संयोजन समितीने आतापर्यंत केला आहे. तथापि, सरकारी लेखापरीक्षण अहवालानुसार हा खर्च किमान दुपटीने वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
टोक्यो ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी ‘आयओसी’कडून १.३ अब्ज डॉलर्सचे अर्थसाहाय्य देण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी दोन अब्ज डॉलर्सची तरतूदसुद्धा करण्यात आली आहे. याशिवाय विम्याद्वारेसुद्धा आर्थिक लाभ मिळेल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 30, 2020 12:19 am