ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेत खेळ आणि त्याचा दर्जा, खेळाडूंचे कौशल्य यापेक्षा चर्चा रंगते आहे ती तप्त वातावरणाची. ग्लोबल वॉर्मिग आणि हवामान बदल या परिसंवादात चर्चित विषयांची झळ टेनिसला पोहोचू लागली आहे. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे सुरू असलेल्या वर्षांतील शेवटच्या ग्रँड स्लॅम अर्थात अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत उन्हाचा प्रकोप झाल्यामुळे खेळाडूंनी माघारसत्रच अवलंबले. शारीरिक क्षमतेला आव्हान देणाऱ्या या वातावरणात स्पर्धा भरवण्याच्या भूमिकेत बदल व्हावा अशी मागणी होऊ लागली आहे. यानिमित्ताने ग्रँड स्लॅम स्पर्धा, उष्णता धोरण, पर्यावरणीय बदल यांचा मुद्देनिहाय घेतलेला वेध.
ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा ही वर्षांतील पहिली ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा. सातत्याने वातावरणातील उष्णता वाढल्याने बहुतांशी खेळाडूंना थकवा, चक्कर यांचा त्रास जाणवला. २०१४मध्ये या स्पर्धेला अतिउष्ण झळांनी ग्रासले होते. उष्णतेची तीव्रता कायम राहिल्याने संयोजकांना काही सामने रद्द करावे लागले, काही पुढे ढकलावे लागले. सुदैवाने कोर्टवर आच्छादनाची व्यवस्था असल्याने काही सामने रात्रीच्या वेळी आयोजित करण्यात आले. या घटनांच्या पाश्र्वभूमीवर ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेचे संयोजक यंदा सावध होते. उन्हाची प्रखरता जास्त होती, मात्र बहुतांशी खेळाडूंनी दोन आठवडे आधीच दाखल होत वातावरणाशी जुळवून घेतले. लाल मातीवर होणाऱ्या फ्रेंच खुल्या स्पर्धा पॅरिस शहरात होतात. इथेही उष्णतेचा प्रकोप सुरूच राहिला. विम्बल्डन म्हणजे हिरवेगार गवत, स्ट्रॉबेरी आणि शिष्टाचारी परंपरेचे प्रतीक. वातावरण तरल राहील अशा शुभ्र वस्त्रांची अट असलेल्या विम्बल्डन स्पर्धेत यंदा एक बॉल बॉय चक्कर येऊन कोसळला. खेळाडूंचीही अवस्था फार वेगळी नव्हती. टेनिसपटूंचा ताफा अमेरिकन खुल्या स्पर्धेसाठी न्यूयॉर्कमध्ये अवतरला. इथे परिस्थिती आणखी बिघडली. तप्त वातावरणाने १२ टेनिसपटूंना माघार घ्यावी लागली. स्पर्धेत आगेकूच करणाऱ्या मंडळींनीही अव्वल दर्जाच्या प्रतिस्पध्र्यापेक्षा सूर्याची तीव्र सव्‍‌र्हिस झेलणे कठीण असल्याचे मान्य केले.
जंगलांच्या जागी उभे राहिलेले सिमेंटचे जंगल, वृक्षराजी तसेच हरित प्रदेशांवर होणारे आक्रमण, ग्रीनहाऊस यामुळे वातावरणातील उष्णतेचे प्रमाण वाढते आहे. बर्फाच्छादित डोंगर वितळत आहेत. वाहनांचा प्रचंड वापर, प्रदूषण, वावातानुकूलित यंत्रणेतून बाहेर पडणारी घातक रसायने यामुळे पृथ्वीवासीयांची संजीवनी असलेल्या ओझोन छिद्राला धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणद्रोही जीवनशैलीमुळे निसर्गाने असहकार पुकारला आहे. जगभरातील प्रत्येक देश हवामान बदलाचे चटके सोसतो आहे. क्योटो प्रोटोकॉलनुसार प्रत्येक देशाच्या कार्बन उत्सर्जन पातळी निश्चित करण्यात आली. मात्र यातही विकसित देशांनी विकसनशील देशांवर कुरघोडी केली. मेलबर्न, पॅरिस, लंडन आणि न्यूयॉर्क ही ग्रँड स्लॅम स्पर्धा आयोजित करणारी शहरे याच विकसित देशांची प्रतीके. टेनिसविश्वाचा मानबिंदू असलेल्या ग्रँड स्लॅम स्पर्धाच्या आयोजनाची ध्वजा घेतलेल्या या शहरांना निसर्गाने तडाखा द्यायला सुरुवात केली आहे. वर्षांतील विविध ऋतूंमध्ये आयोजित होणाऱ्या या स्पर्धादरम्यानच्या वातावरणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पाऱ्याने सातत्याने चाळिशी ओलांडली आहे. हवामान बदलाचा शास्त्रोक्त अभ्यास करणाऱ्या ‘क्लायमेट सेंटर’ या संस्थेने या चारही उपनगरांचा ग्रँड स्लॅम स्पर्धेदरम्यान अभ्यास केला. गेल्या दहा वर्षांमध्ये या चारही शहरांची हवामान पातळी झपाटय़ाने वाढते आहे. या शहरांकडून पर्यावरणसंवर्धक जीवनशैलीचे अनुसरण होत नसल्याने पारा वाढतच जाण्याचे अनुमान या संस्थेने वर्तवले आहे. टेनिस स्पर्धेचे संयोजक शहराचे हवामान आणि पर्यावरण चांगले राहावे यासाठी काम करू शकतात, मात्र त्याला मर्यादा आहेत. हे ओळखूनच संयोजकांनी उष्णता धोरण तयार केले आहे. शास्त्रोक्त अभ्यासानंतर टेनिसपटूंना खेळण्यायोग्य हवामान त्यांनी निश्चित केले आहे. पाऱ्याने ही पातळी ओलांडली तर खेळ पुढे ढकलला जाऊ शकतो, खेळाडूंना विश्रांती घेता येते आणि उष्णतेचा प्रकोप सुरूच राहिला तर खेळ रद्द करण्याची तरतूद या नियमात आहे.
तूर्तास, उष्णता धोरण ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या संयोजकांनी अंगीकारले आहे. मात्र ही तात्पुरती उपाययोजना आहे. सामने नियोजित वेळेत पूर्ण न झाल्यास किंवा रद्द करावे लागल्यास वेळापत्रक कोलमडू शकते. साधारणत: उन्हाची प्रखरता दिवसा असते. हा मुद्दा लक्षात घेता ग्रँड स्लॅम स्पर्धा संयोजकांनी कोर्टवर आच्छादनाची व्यवस्था केली आहे. उन्हाची तीव्रता वाढू लागल्यास हे आच्छादन कोर्टवर अवतरते. गरजेनुसार आच्छादन काढण्याची, बसवण्याची सोय करता येते. मात्र सरसकट सर्व टेनिसपटूंनी आच्छादित कोर्टवर खेळण्याला पसंती दिलेली नाही. आच्छादन अर्थातच खर्चीक मुद्दा पण भविष्यात निसर्गाचा फटकारा वाढेल हे ध्यानात घेऊन सगळेच सामने संध्याकाळ आणि रात्री खेळवण्याचा विचार ग्रँड स्लॅम संयोजक करीत आहेत. ग्रँड स्लॅम स्पर्धेतले पुरुषांचे पाच सेटचे सामने तीन सेटचे करण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे. जेणेकरून थकण्याचे कारणच कमी होईल. मुळातच हे सव्यापसव्य करण्याचे कारण ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये गुंतलेला पैसा. चार ग्रँड स्लॅम स्पर्धाची एकूण बक्षीस रक्कम १५ कोटी डॉलर्स इतकी प्रचंड आहे. टेनिसपटूंच्या बरोबरीने स्पर्धेशी संलग्न प्रत्येकाला मालामाल करणाऱ्या स्पर्धेचा डोलारा कोसळू नये, यासाठी ही धडपड.
खेळ आणि खेळाडूंना हवामान बदलाचा त्रास सर्वाधिक होईल असा निष्कर्ष या विषयाशी निगडित तज्ज्ञांनी काढला आहे. प्रचंड उन्हामुळे शरीरातले पाणी कमी होते, ऊर्जेची पातळी मंदावते. यामुळे अशक्तपणा, चक्कर, दृष्टीत धूसरता, स्नायूंमध्ये पेटका येणे अशी लक्षणे दिसतात. त्यामुळे फक्त टेनिसच नव्हे, उघडय़ा मैदानात खेळले जाणारे खेळ आणि खेळाडूंना याचा फटका बसू लागला आहे. मुळातच मनोरंजन हा खेळाचा प्राथमिक हेतू जाऊन त्याला आता रीतसर व्यवसायाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे खेळाडूंना व्यवसायातल्या दुष्परिणामांना ओलांडूनच वाटचाल करायची आहे. आर्थिक फायद्याच्या समीकरणांबरोबर संयोजकांनी पर्यावरणपूरक धोरण स्वीकारल्यास अडथळ्यांची शर्यत सोपी होऊ शकते.
paragphatak@expressindia.com