|| प्रशांत केणी
करोनाच्या भीतीमुळे भारतीय खेळाडूंनी असमर्थता दर्शवल्यामुळे इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना होऊ शकला नाही. पाकिस्तानविरुद्ध सामन्यास काही तास असताना सुरक्षेच्या कारणास्तव न्यूझीलंडने तडकाफडकी मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. आगामी इंग्लंडचा पाकिस्तान दौरा आणि इंग्लंडचा अ‍ॅशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौरासुद्धा होईल, याची शाश्वती नाही. पण या साऱ्या घटनाक्रमात जगातील सर्वात शिस्तबद्ध प्रशासनासाठी ओळखल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अस्तित्व कुठेच जाणवत नसल्यामुळे ‘हे तर पंचांविना सामने’ अशी टीका होत आहे.

भारत-इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी रद्द केल्यानंतर आठवडा उलटून गेला तरी त्याचा निकाल अनुत्तरित आहे. इंग्लंडने आधी आपल्या पत्रकात भारताने अखेरचा सामना बहाल केल्याचे म्हटले होते. त्यामुळे मालिका २-२ अशी बरोबरी झाली असती; पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) ते नामंजूर असल्याने सामना रद्द केल्याचे जाहीर केले. त्यामुळे भारताने २-१ अशी मालिका जिंकत इंग्लंडमधील १४ वर्षांचा विजयदुष्काळ संपवला? पण मालिका समाप्तीनंतरचा निकाल अद्यापही अस्पष्ट आहे. हा सामना काही काळाने पुन्हा खेळवून मालिकेचा निकाल लागेल, हा पर्यायसुद्धा मांडला गेला. जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या गुणांचे काय? हासुद्धा प्रश्न सुटलेला नाही. द्विराष्ट्रीय समझोता होणे आवाक्याबाहेर गेल्याने इंग्लंड क्रिकेट मंडळ ‘आयसीसी’कडे न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.

मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह काही साहाय्यक मार्गदर्शक आणि फिजिओला करोनाची लागण झाल्यामुळे भारतीय चमूतील खेळाडू असुरक्षित होते. बहुतांशी खेळाडू कुटुंबीयांसह तिथे होते. त्यामुळे सर्व खेळाडूंच्या करोना चाचण्या नकारात्मक आल्यानंतरसुद्धा भारतीय खेळाडूंनी अखेरचा सामना खेळण्यास नकार दिला. पाच दिवसांतच सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगलाही (आयपीएल) काही मंडळी जबाबदार धरत आहेत. हे प्रकरण ताजे असतानाच रावळपिंडीत दाखल झालेल्या न्यूझीलंड संघाने शुक्रवारी तीन एकदिवसीय आणि पाच ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यास नकार दिला. खेळाडूंच्या असुरक्षिततेची किंवा धमकीची माहिती मात्र न्यूझीलंडने उघड केली नाही. पूर्वाश्रमीचे क्रिकेटपटू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी थेट न्यूझीलंडच्या पंतप्रधानांशी चर्चा करून सुरक्षेविषयी विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण तोही अपयशी ठरला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक वादळे आली. १९७७मध्ये कॅरी पॅकरची सर्कस असो किंवा २००७मध्ये इंडियन क्रिकेट लीग (आयसीएल) ‘आयसीसी’ने ती समर्थपणे परतवली. पावसाचा फटका बसलेल्या सामन्यांसाठीसुद्धा डकवर्थ-लुइस-स्टर्न पद्धतीनुसार समीकरण जागतिक क्रिकेटमध्ये कार्यरत आहे. कालपरत्वे त्रुटी कमी करण्यासाठी या नियमावलीत काही बदलही झाले. पण संघांनी सामन्याचे निकाल स्वीकारून मार्गक्रमण केले. भारत आणि इंग्लंड हे ‘आयसीसी’च्या अव्वल त्रिकुटापैकी असल्याने तिथे ‘आयसीसी’नेही मौनाची भूमिका घेतली असावी. पण न्यूझीलंड-पाकिस्तान मालिकेविषयी काय म्हणता येईल?

पाकिस्तान हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी असुरक्षित असल्याचे २००९मध्ये जगाने अनुभवले आहे. पण २०१५पासून काही देश तिथे खेळले आहेत. २००९पर्यंत श्रीलंकासुद्धा ‘एलटीटीई’च्या हल्ल्याच्या दहशतीखाली वावरत होता. कोलंबोतील बॉम्बस्फोटामुळे १९९६च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या संघांनी तिथे खेळण्यास नकार दिला. त्यामुळे प्रतिस्पर्धी श्रीलंकेच्या खात्यावर विजयांचे गुण जमा झाले. २००८मध्ये मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामुळे इंग्लंडचा संघ मायदेशी परतला. त्यामुळे दोन एकदिवसीय सामने रद्द करण्यात आले. पण दोन आठवड्यांत इंग्लंडचा संघ भारतात परतून दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळला. अशी अनेक उदाहरणे क्रिकेटमध्ये आढळतात.

नैसर्गिक आपत्तीने बऱ्याचदा क्रिकेटला आपल्या योजना बदलाव्या लागल्या आहेत. करोना साथीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन करतानाही ‘आयसीसी’ने कडक नियम आणले. त्याद्वारे जैव-सुरक्षित परिघात क्रिकेट सामन्यांचे प्रयोग यशस्वी करून दाखवले. पण ताज्या दोन्ही प्रकरणांत ‘आयसीसी’ची नियमावली किंवा त्यांची भूमिका किंवा निकाल कुठेच दिसत नाहीत. द्विराष्ट्रीय चर्चेतून निष्पन्नता न झाल्याने इंग्लंड ‘आयसीसी’चा धावा करीत आहे, तर पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष रमीझ राजा यांनीही ‘आयसीसी’ला उत्तर द्यावे लागेल, असे मत व्यक्त केले आहे. ‘ही न्यूझीलंडकडून पाकिस्तानच्या क्रिकेटची हत्या आहे’ असे माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने नमूद केले आहे. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट नकाशावर पाकिस्तानला फारसे महत्त्व दिले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. या सर्व पाश्र्वभूमींवर ‘आयसीसी’ निर्णयाधिकाऱ्याच्या भूमिकेतून कोणता न्याय देईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

prashant.keni@expressindia.com