सुनील छेत्रीने केलेल्या भावनिक आवाहनाला मुंबईकर फुटबॉलप्रेमींनी दिलेला उदंड प्रतिसाद.. त्यामुळे भारतीय खेळाडूंना मिळालेले बळ.. धो-धो बरसणाऱ्या पावसाचा मारा अंगावर झेलत उपस्थित चाहत्यांवर फुटबॉलची मोहिनी करण्यासाठी भारतीय खेळाडूंनी केलेले सर्वतोपरी प्रयत्न.. भारत विरुद्ध केनिया या आंतरखंडीय फुटबॉल स्पध्रेतील सामन्याचे हे वर्णन.. निकालापेक्षा प्रेक्षकांच्या अभूतपूर्व पाठिंब्यामुळे ही लढत खऱ्या अर्थाने स्मरणात राहील. पेनल्टी स्पॉटकिकवर गोल करण्यासाठी पुढे सरसावलेल्या छेत्रीला पाहून अनेकांच्या अंगावर काटे उभे राहिले. भावनिक आणि तितक्याच रोमांचक ठरलेल्या या सामन्यात भारत ३-० असा जिंकला.

चार देशांच्या स्पर्धेतील पहिल्याच लढतीत चायनीज तैपेईसारख्या संघाला (५-०)  धूळ चारूनही तुरळक पाठिंब्यामुळे निराश झालेल्या छेत्रीला भावनिक आवाहन करावे लागले. स्पॅनिश, इंग्लिश लीगप्रमाणे आमचा खेळ दर्जेदार नसेलही, परंतु आम्ही त्या खेळाडूंइतकीच मेहनत घेतो. ती मेहनत पाहायला स्टेडियमवर या, असे छेत्री म्हणाला होता. त्यालाच प्रतिसाद म्हणून सर्व तिकिटांची ऑनलाइन विक्री झाली आणि स्टेडियमबाहेर काळ्या बाजारात तिकीट मिळतेय का? यासाठीही मोठी गर्दी जमली होती. भर पावसात झालेली ही लढत खेळाडूंचा शारीरिक कस पाहणारी होती व त्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी उत्तम खेळ करत प्रेक्षकांची दाद मिळवली. ‘भारत माता की जय.. वंदे मातरम्.. छेत्री, छेत्री..’ अशा घोषणा स्टेडियम दणाणून सोडत होत्या.

पहिल्या सत्रात दोन्ही संघांचा खेळ तुल्यबळ झाला. सलामीच्या लढतीत आपापल्या प्रतिस्पर्धीवर मात करत हे संघ एकमेकांसमोर उभे ठाकले होते. दोन्ही संघांना समसमान संधी मिळाल्या, पण गोल करण्यात कोणालाही यश आले नाही.  दुसरे सत्र भारतीयांच्या नावावर राहिले. संदेश झिंगनचा उत्तम बचाव आणि जेजे लाल्पेखलुआ, प्रणॉय हल्दर, होलिचरण नाझरी व उदांता सिंग या मधल्या फळीचे कौशल्य कौतुकास पात्र ठरले. भारताने गोल करण्याच्या अनेक संधी दवडल्या, परंतु ६८व्या मिनिटाला  भारताची प्रतीक्षा संपली. केनियाच्या खेळाडूने पेनल्टी क्षेत्रात छेत्रीला ढकलल्याने भारताला स्पॉट-किक मिळाली. ती घेण्यासाठी पुढे आलेल्या छेत्रीला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व प्रेक्षक जागेवर उभे राहिले. मोबाइलवर हा क्षण कैद करण्यासाठी सर्व सज्ज झाले आणि छेत्रीचा हा गोल क्षणात समाजमाध्यमांवर वाऱ्यासारखा पसरला. त्यात ७१व्या मिनिटाला जेजेने भर घातली. व्हॉलीद्वारे जेजेने केलेला हा गोल भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा ठरला.

केनियानेही पुनरागमनासाठी सर्वार्थाने प्रयत्न केले, परंतु भारताची बचाव फळी भेदण्यात ते अपयशी ठरले. गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधूनेही अप्रतिम बचाव केले.  भरपाई वेळेत (९०+१ मि.) छेत्रीने बलवंत सिंगच्या साहाय्याने आणखी एक एक गोल केला आणि स्टेडियमवर एकच जल्लोष झाला. छेत्रीने प्रेक्षकांमध्ये धाव घेतल्याने त्यांचा आनंद अधिक द्विगुणित झाला. छेत्रीच्या जयघोषाने क्रीडा संकुल दणाणून गेले होते. छेत्रीनेही प्रेक्षकांच्या या प्रतिसादाचे आभार मानले. सामना संपल्यानंतर त्याने सहकाऱ्यांसमवेत स्टेडियमला प्रदक्षिणा घातली. प्रेक्षकांच्या दिशेने हात जोडून उभा राहिलेला छेत्री पाहून अनेकांचे डोळे पाणावले.

  • बायचुंग भुतियानंतर १०० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवणाऱ्या छेत्रीला सामन्याआधी भुतिया व आय. एम. विजयन या मातब्बर फुटबॉलपटूंच्या हस्ते गौरवण्यात आले.
  • छेत्रीने गोलसंख्या ६१वर नेत डेव्हिड व्हिलाला (५९) मागे टाकले आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंत तिसरे स्थान मिळवले. आता मेसीचा ६४ गोलचा विक्रम त्याला खुणावत आहे. या क्रमवारीत पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो (८१) पहिल्या स्थानावर आहे.