News Flash

सुनील छेत्रीचे नेतृत्व प्रेरणादायी

बंगळुरू एफसीचा बचावपटू रिनो अँटोचे प्रांजळ मत

बंगळुरू एफसीचा बचावपटू रिनो अँटोचे प्रांजळ मत

आय-लीग विजेत्या बंगळुरू एफसी क्लबने बुधवारी मलेशियन जोहोर क्लबचा पराभव करून एएफसी चषक फुटबॉल स्पध्रेच्या अंतिम फेरीत धडक मारण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. एएफसी चषक स्पध्रेच्या अंतिम फेरीत आत्तापर्यंत एकाही भारतीय क्लबला प्रवेश मिळवता आला नव्हता आणि सुनील छेत्रीच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर बंगळुरूने इतिहास घडविला. ‘सुनील छेत्री हा आमचा प्रेरणास्रोत आहे आणि त्याच्या चतुर नेतृत्वामुळेच बंगळुरू एफसीला हा विक्रम प्रस्थापित करता आला,’ असे प्रांजळ मत बंगळुरू एफसीच्या रिनो अँटोने व्यक्त केले.

बुधवारी बंगळुरू येथील श्री कांतिरावा स्टेडियमवर बंगळुरूने छेत्रीच्या दोन गोलच्या जोरावर गतविजेत्या जोहोर दारूल ताझीमवर ३-१ अशी मात केली. याआधी डेम्पो (२००८) आणि  ईस्ट बंगाल (२०१३) क्लब्स यांनी उपांत्य फेरीची वेस ओलांडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. मात्र, बंगळुरूने हा कटू इतिहास पुसला. रिनो म्हणाला, ‘या सामन्यापूर्वी आमच्यावर दडपण नव्हते, कारण आम्ही जोहोरला त्यांच्याच घरच्या मैदानावर १-१ असे बरोबरीत रोखून आपली बाजू भक्कम केली होती. त्यामुळे मैदानावर जाऊन शंभर टक्के खेळ करण्याचाच निर्धार आम्ही केला होता. सुनीलने आम्हाला मुक्तपणे खेळ करण्याचा सल्ला दिला. हा विजय माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे.’

स्पॅनिश फुटबॉलपटू अल्बर्ट रोका यांच्या मार्गदर्शनाखाली बंगळुरूने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यांच्याविषयी रिनोला विचारले असता तो म्हणाला, ‘रोका यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याचा आनंदच निराळा आहे. आमच्या कलेने ते प्रशिक्षण देतात. जोहोरविरुद्ध आम्ही कोणतीही वेगळी रणनीती आखली नव्हती. ४-२-३-१ या डावपेचाने आम्ही मैदानावर उतरलो. मध्यरक्षक आणि बचावफळीवर अधिक भर देत केवळ एकच आक्रमणपटू खेळविण्याचा आमचा निर्णय योग्य ठरला.’

बंगळुरूने जवळपास २२ हजार चाहत्यांच्या साक्षीने हा विजय मिळवला. याविषयी रिनो म्हणतो, ‘प्रेक्षकांनी आमच्यासाठी १२व्या खेळाडूची भूमिका बजावली. त्यांच्या पाठिंब्यामुळे आम्ही हा विजय मिळवू शकलो. गेली तीन वर्षे मी येथे खेळत आहे आणि येथील क्रीडा प्रेमींचे फुटबॉलप्रेम कौतुकास्पद आहे. आता दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर ५ नोव्हेंबरला होणाऱ्या अंतिम लढतीच्या सरावाला सुरुवात करणार आहोत.’

 

डी. वाय. पाटील स्टेडियमला फिफाची मान्यता

१७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पध्रेचे सामने नवी मुंबईत होणार

नवी मुंबई : नवी मुंबई  येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमच्या सुविधा आणि तयारीवर समाधान व्यक्त करताना जागतिक फुटबॉल महासंघाने (फिफा) पुढील वर्षी होणाऱ्या १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पध्रेचे सामने येथे खेळवण्यास गुरुवारी मंजुरी दिली. कोचीपाठोपाठ नवी मुंबई फुटबॉल विश्वचषक सामन्यांचे आयोजन करणार आहे. फिफाचे उच्चस्तरीय अधिकारी, स्थानिक आयोजन समितीच्या सदस्यांसह एकूण २३ अधिकाऱ्यांनी गुरुवारी डी. वाय. पाटील स्टेडियमची पाहणी केली.

‘नोव्हेंबर २०१४मध्ये जॉय भट्टाचार्य आणि मी या स्पध्रेसाठी स्टेडियमचा शोध घेत होतो. स्पर्धा आयोजनाच्या ठिकाणांचा शोध घेताना आम्हाला अनेक अडचणी येत होत्या, परंतु मुंबईत त्यावर आम्हाला तोडगा सापडला. आम्ही डॉ. विजय पाटील यांची भेट घेतली. डॉ. पाटील आणि डी. वाय. पाटील संस्था व येथील ३०० विद्यार्थ्यांनी या स्पध्रेचे महत्त्व जाणले. आयुष्यभर अशी संधी मिळणे दुर्मीळ असल्याचे त्यांना माहीत होते,’ असे स्पर्धा संचालक झेव्हियर सेप्पी यांनी सांगितले.

‘हा आमच्यासाठी ऐतिहासिक क्षण आहे. अखिल भारतीय फुटबॉल असोसिएशन, अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि पश्चिम भारत फुटबॉल असोसिएशनकडून आम्हाला चांगले सहकार्य मिळाले. भारतीय फुटबॉलसाठी हा आनंदाचा क्षण आहे, असे डॉ. डी. वाय. पाटील क्रीडा अकादमीचे अध्यक्ष  विजय पाटील यांनी सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 2:51 am

Web Title: sunil chhetri
Next Stories
1 सिंधूचा धक्कादायक पराभव
2 भारताकडून जपानचा धुव्वा
3 India vs New Zealand, 2nd ODI in New Delhi : भारतीय संघाला पराभवाचा धक्का
Just Now!
X