News Flash

सातत्यपूर्ण व सर्वोत्तम कामगिरीचे ध्येय – छेत्री

भारतीय संघाची या स्पर्धेच्या पात्रता फेरीत म्यानमार संघाशी गाठ पडणार आहे.

सातत्यपूर्ण व सर्वोत्तम कामगिरी करीत आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत भारताचा नावलौकिक उंचावण्याचे आमचे ध्येय आहे, असे भारतीय संघाचा अनुभवी आक्रमक खेळाडू सुनील छेत्रीने सांगितले.

भारतीय संघाची या स्पर्धेच्या पात्रता फेरीत म्यानमार संघाशी गाठ पडणार आहे. गतवेळी या स्पर्धेत म्यानमारने भारताला हरवले होते. यंदा या पराभवाची परतफेड करण्याचे आमचे ध्येय आहे, असे छेत्रीने सांगितले. तो म्हणाला, ‘‘आम्हाला पहिल्याच सामन्यात विजयी सलामी करावयाची आहे. प्रत्येक वेळी या स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान मिळविण्याचे आमचे लक्ष्य आहे. म्यानमार हा दक्षिण आशियाई देशांमधील तुल्यबळ प्रतिस्पर्धी आहे. त्यामुळेच त्यांच्याविरुद्धच्या सामन्यात क्षमतेच्या शंभर टक्केइतकी कामगिरी करण्यावर आमचा भर राहणार आहे.’’

भारतीय संघाला या स्पर्धेतील साखळी ‘अ’ गटात स्थान देण्यात आले असून, त्यांना म्यानमारबरोबरच किर्गिझस्तान व मकाऊ यांच्याबरोबरही झुंजावे लागणार आहे. या सामन्यांपूर्वी स्पर्धात्मक सरावासाठी भारतीय संघ कंबोडियाबरोबर २२ मार्च रोजी प्रदर्शनीय सामना खेळणार आहे.

साखळी गटातील आव्हानाविषयी छेत्री म्हणाला, ‘‘साखळी गटातच आमची सत्त्वपरीक्षा आहे. अर्थात, त्याचे कोणतेही दडपण आम्ही घेणार नाही. सामन्यात शेवटपर्यंत जिद्दीने खेळण्यावरच आम्ही भर देणार आहोत. संघाचे मार्गदर्शक स्टीफन कॉन्स्टंटाईन यांच्या सल्ल्यानुसार आम्ही वेगवेगळे डावपेच शिकत आहोत. क्लबस्तरावर खेळण्यापेक्षा देशासाठी खेळताना खूपच एकाग्रतेने व निष्ठेने खेळावे लागते. कंबोडियाबरोबर आम्ही परदेशात प्रदर्शनीय सामना खेळणार असल्यामुळे आम्हाला वेगळा अनुभव मिळणार आहे.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 2:15 am

Web Title: sunil chhetri 2
Next Stories
1 चांगले यश मिळवण्याबाबत आनंद आशावादी
2 रिअल माद्रिदसमोर बायर्न म्युनिकचे आव्हान
3 नक्षल हल्ल्यातील हुतात्म्यांच्या वारसांना सायनाने दिले ६ लाख रुपये
Just Now!
X