नवी दिल्ली : भारताच्या १६ वर्षांखालील आणि २० वर्षांखालील संघांच्या कामगिरीने भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्री खूप प्रभावित झाला आहे. त्यांनी अपेक्षेपेक्षाही अफलातून सुंदर खेळ करून दाखवला असल्याने भविष्यात ते खूप मोठी ध्येये गाठण्यात यशस्वी होतील, असा विश्वास छेत्री यांनी व्यक्त केला आहे.

भारताच्या १६ वर्षांखालील संघाने इराकसारख्या नामवंत संघाला पराभवाचा धक्का दिला. तर २० वर्षांखालील संघाने तर जगातील अव्वल मानल्या जाणाऱ्या अर्जेटिनाच्या संघाला पराभूत करून सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले होते. १९ वर्षांखालील संघाच्या कामगिरीनेदेखील छेत्री यांना प्रभावित केले. मात्र, १६ वर्षांखालील संघ म्हणजे एक अफलातून समीकरण जमून आले असल्याचे छेत्रीने नमूद केले. ‘‘प्रशिक्षक बिबीआनो यांनी खूप अफलातून कामगिरी बजावली आहे. त्यांनी याच प्रकारे सांघिक कामगिरीत प्रगती केल्यास ते खूप मोठी ध्येये गाठू शकतील, असा विश्वास मला आताच वाटत आहे. फक्त त्यांनी खेळावरील नजर अन्यत्र कुठेही ढळू देऊ नये, ’’ असेदेखील छेत्री म्हणाले.

लीगचे मोठे योगदान

भारतीय संघ सध्या २०१९ च्या आशियाई चषकासाठी जोरदार तयारी करीत असल्याचे छेत्रीने सांगितले. भारतीय फुटबॉलमध्ये सर्वच वयोगटातील संघांमध्ये अनेक चांगल्या बाबी घडत आहेत. त्या नियमितपणे घडण्यामागे फुटबॉलच्या इंडियन सुपर लीगचे योगदान मोठे असल्याचेही त्यांनी नमूद केले.