सुनील छेत्री हा नैपुण्यवान व महत्त्वाचा खेळाडू आहे. जर त्याने शारीरिक तंदुरुस्ती टिकवली, तर आणखी चार ते पाच वर्षे तो आंतरराष्ट्रीय स्तरावर अव्वल दर्जाची कामगिरी करू शकेल, असे भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाइन यांनी सांगितले.

भारताने मुंबईच्या शहाजी राजे क्रीडा संकुलात झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीत पोतरे रिको संघावर ४-१ असा सफाईदार विजय मिळवला. या लढतीत सुनीलने एक गोल केला आणि दोन गोल करण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांना चांगली साथ देऊन महत्त्वपूर्ण कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीबद्दल कॉन्स्टन्टाइन म्हणाले, ‘‘सुनील हा गेली दहा वर्षे सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी खेळ करीत आहे. मी अनेक वेळा तुझी कारकीर्द संपुष्टात आली आहे, असे चेष्टेने त्याला सांगत असतो. तथापि या चेष्टेकडे दुर्लक्ष करीत तो नेहमी सांगत असतो, की मी आणखी चार-पाच वर्षे खेळणार आहे. त्याच्याकडील शारीरिक क्षमता लक्षात घेतली, तर त्याच्याकडे आणखी भरपूर दिवस खेळण्याची शैली आहे. सुनीलकडे चांगली नेतृत्वशैली आहे.’’

कॉन्स्टन्टाइन पुढे म्हणाले, ‘‘सुनीलने सेंटर फॉरवर्ड खेळाडूच्या मागे राहून खेळले, तर आणखी चांगल्या चाली तो करू शकतो. अन्य खेळाडूंकडे पास देण्यात त्याची हुकूमत आहे. अर्थात काही सामन्यांमध्ये त्याने डाव्या किंवा उजव्या स्थानावर खेळावे असे मला वाटत असते. त्याच्याकडे असलेले चातुर्य लक्षात घेतले, तर तो कोणत्याही स्थानावर अव्वल दर्जाची कामगिरी करू शकतो.’’

पोतरे रिको संघावरील विजयाबाबत कॉन्स्टन्टाइन म्हणाले, ‘‘मला पराभव आवडत नाही. जेव्हा जेव्हा आमचा संघ जिंकतो, तेव्हा तेव्हा मला समाधान वाटत असते. पोतरे रिको संघाला आमच्यापेक्षा ३८ क्रमांकांनी वरचे स्थान असल्यामुळेच त्यांच्याविरुद्धचा विजय माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. गयाना, त्रिनिदाद व टोबॅको आदी संघांविरुद्ध सामने आयोजित करण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यांच्याविरुद्धच्या सामन्यांमधील अनुभव आमच्या खेळाडूंसाठी उपयुक्त होईल.’’