आपल्या शंभराव्या सामन्यात केनियाविरोधात दोन गोल मारत सुनील छेत्रीने आपली गोलसंख्या ६१ वर नेत डेव्हिड व्हिलाला (५९) मागे टाकले आहे. भारताने केनियावर ३-० ने मात करत हा सामना जिंकला. सुनील छेत्रीने केलेल्या भावनिक आवाहनानंतर संपूर्ण स्टेडिअम प्रेक्षकांनी तुडूंब भरलं होतं. यावेळी सुनील छेत्रीने प्रेक्षकांची निराशा न करता विजय तर मिळवलाच सोबत आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंत तिसरे स्थान मिळवले आहे.

सुनील छेत्रीने गोलसंख्या ६१वर नेत डेव्हिड व्हिलाला (५९) मागे टाकत आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंत तिसरे स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे मेसीला मागे टाकण्यासाठी त्याला आता फक्त चार गोलची गरज आहे. मेसीचा ६४ गोलचा विक्रम आहे. या क्रमवारीत पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो (८१) पहिल्या स्थानावर आहे.

बायचुंग भुतियानंतर १०० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवणाऱ्या छेत्रीला सामन्याआधी भुतिया व आय. एम. विजयन या मातब्बर फुटबॉलपटूंच्या हस्ते गौरवण्यात आले.

आपल्या कारकिर्दीचा १०० वा सामना खेळणाऱ्या सुनील छेत्रीने इंटरकॉन्टिनेंटल चषकात दोन गोल झळकावले. अंधेरीतल्या मैदानावर झालेल्या सामन्यात भारताने केनियावर ३-० अशी मात केली. भारताचा या स्पर्धेतला हा दुसरा विजय ठरलेला आहे. क्रिकेटवेड्या देशात फुटबॉलचा सामना पाहण्यासाठी झालेली गर्दी पाहून सुनील छेत्री भारावला आहे. सामना संपल्यानंतर त्याने ट्विटरच्या माध्यमातून लोकांचे आभार मानत असा पाठिंबा दिलात तर मैदानात जीवही देऊ असं म्हटलं आहे.

सुनील छेत्रीने ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की जर आम्हाला देशासाठी खेळताना नेहमी असा पाठिंबा मिळाला तर मैदानात आमचा जीवही देऊ. ही रात्र स्पेशल होती कारण आपण सगळे एकत्र होतो. स्टॅण्डमध्ये उभे राहून ओरडणारे आणि घरी बसून चिअर करणाऱ्यांचे आभार’.

केनियावर ३-० ने मात –
पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल झळकावण्यात अपयश आलं. मात्र दुसऱ्या सत्रात भारताने आघाडी घेत सामन्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं. यानंतर जेजे ने ७१ व्या मिनीटाला गोल झळकावत भारताची आघाडी २-० ने वाढवली. यानंतर दुसऱ्या सत्राच्या अतिरीक्त वेळेत कर्णधार छेत्रीने ९१ व्या मिनीटाला आणखी एक गोल झळकावत भारताला ३-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. केनियाचा दुबळा बचाव भारताच्या आक्रमण करणाऱ्या फळीला थांबवू शकला नाही. या स्पर्धेत भारताचा पुढचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.