देशासाठी सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू सुनील छेत्रीच्या नावाची भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक गणल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्कारासाठी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडून (एआयएफएफ) शिफारस केली जाणार आहे.

छेत्री हा भारताचा सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून ओळखला जात असून, त्याने ९७ सामन्यांमध्ये ५६ गोल नोंदवले आहेत. भारतीय संघाचा कर्णधार म्हणून त्याने संघासाठी मोठे योगदान दिले असून खेळाडू म्हणूनदेखील त्याने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. ‘पद्मश्री’सारख्या भारताच्या चौथ्या क्रमांकाच्या सर्वोच्च सन्मानासाठी कुणा एका फुटबॉलपटूचे नाव सुचवायचे असेल तर सुनील छेत्री हेच असायला हवे, असे सूत्रांनी म्हटले आहे.

याबाबत संघटनेचे सरचिटणीस कुशल दास यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जेजे लालपेखलुआ आणि गुरप्रीतसिंग संधू यांची नावे अर्जुन पुरस्कारासाठी सुचवण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच ‘पद्मश्री’साठी छेत्री यांचे नाव सुचवले आहे का? असे विचारले असता त्याचे उत्तर देण्याचे मात्र टाळले. छेत्रीने किर्गिझस्तानविरुद्ध खेळताना ५४वा गोल साकारताना इंग्लंडकडून सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंपैकी रुनीवर मात केली.