भारताच्या माजी प्रशिक्षक सुनील डबास यांचे मत

नुकत्याच झालेल्या ‘खेलो इंडिया’ क्रीडा महोत्सवात मुलांचे आणि मुलींचे सामने एकाच मैदानावर मॅटच्या आवश्यक आकारमानाच्या बदलानुसार झाले. हा प्रयोग महिला कबड्डीसाठी दिशादर्शक आहे, असे मत पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या माजी प्रशिक्षक सुनील डबास यांनी व्यक्त केले.

‘‘दोन्ही बाजूंच्या लॉबीचे मॅट उलटे करून ही आकारमान बदलाची संकल्पना ‘खेलो इंडिया’मध्ये राबवण्यात आली होती. याशिवाय दिल्लीत झालेल्या एका क्रीडाविषयक प्रदर्शनात मी रोलिंग मॅटसुद्धा पाहिले आहे. ही मॅट बनवणाऱ्या कंपनीत जाऊन या आकारमानाच्या अडचणीवर लवकरच तोडगा काढण्यासाठी मी इच्छुक आहे,’’ असे डबास यांनी सांगितले.

रोह्यत झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेला भारतीय हौशी कबड्डी महासंघाने नेमलेल्या निरीक्षक डबास म्हणाल्या, ‘‘कबड्डीच्या विकासाला आता प्रो-कबड्डी लीगमधील प्रयोगांमुळेच दिशा मिळत आहे. मात्र मैदानाच्या आकारमानामुळे महिलांची लीगसुद्धा होऊ शकलेली नाही. काही वर्षांपूर्वी प्रायोगिक स्तरावर महिलांची तिरंगी लीग झाली होती. पण पुरुषांच्या मैदानावर महिलांना खेळावे लागल्यामुळे ती अपयशी ठरली होती. त्यानंतर लीगच्या दृष्टीने पुरुष आणि महिलांच्या मैदानाचे आकारमान समान करण्याबाबतही चर्चा झाली. पण याबाबत अनुकूलता आढळली नाही.’’

प्रो-कबड्डीचा महिला कबड्डीवर होणारा परिणाम मांडताना डबास म्हणाल्या, ‘‘प्रो-कबड्डी लीग हा एकच फरक पुरुषांच्या आणि महिलांच्या कबड्डीमध्ये आहे. अन्यथा, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत कबड्डीमध्ये महिला कबड्डीला पुरुषांइतक्याच सोयीसुविधा मिळतात. त्यामुळे महिला कबड्डीपटू हे सामने पाहून स्वत:ला विकसित करतात.’’

महिला कबड्डीमध्ये रोजगाराची पुरेशी संधी नाही, याबाबत डबास यांनी सांगितले की, ‘‘महिला कबड्डीमध्ये कंपन्या-आस्थापने यांच्या संघांचे प्रमाण नगण्य आहे. भारतीय रेल्वेवगळता बाकीच्या मोठय़ा सार्वजनिक किंवा खासगी स्तरावरील कंपन्यांमध्ये महिलांचे कबड्डी संघ नाहीत. मात्र भविष्यात महिला कबड्डीचे चित्र पालटेल अशी मला आशा आहे.’’

रोह्य़ातील राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा उदयोन्मुखांसाठी प्रेरणादायी!

ग्रामीण भागात राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेसारख्या मोठय़ा स्पध्रेचे नियोजन करणे, हे निश्चितच आव्हानात्मक होते. कबड्डीपटू होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक खेळाडूंना या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूंचा खेळ प्रेरणादायी ठरेल, असे मत डबास यांनी व्यक्त केले.

‘‘शहरामधील नागरिकांना मोठय़ा खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी बऱ्याचदा मिळत असते. परंतु ग्रामीण भागातील जनतेलाही मुख्य प्रवाहाशी निगडित राहण्याचा अधिकार आहे. मी स्वत:सुद्धा ग्रामीण भागातून पुढे आली आहे. त्यामुळे प्रदूषणमुक्त आणि निसर्गसंपन्न अशा रोह्य़ातील स्पध्रेचे वातावरण मला अतिशय भावले,’’ असे डबास यांनी सांगितले.