भारतीय संघाने पहिला सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यात विंडीजने दमदार पुनरागमन केले. सिमन्सच्या नाबाद अर्धशतकी खेळाच्या जोरावर दुसऱ्या टी २० सामन्यात भारतावर मात केली. ८ गडी राखून मिळवलेल्या या विजयासह वेस्ट इंडीजने मालिकेत १-१ ने बरोबरी साधली.
आज मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना आहे. हा सामना गमावला तर भारताला मालिका गमावण्याचा धोका आहे. त्यामुळे विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. अशा परिस्थितीत भारताने काय करावे? याबाबत सुनील गावसकर यांनी मार्गदर्शने केले.

“तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात फिल्डिंग ही खूप महत्त्वाची गोष्ट ठरेल. जर भारताला सामना जिंकायचा असेल तर, फलंदाजांना सहज धावा करून देऊ नका. धावा रोखा आणि प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणा. भारतीय संघ खरंच खूप चांगली कामगिरी करतो आहे. पण भारतीय खेळाडूंनी आपले क्षेत्ररक्षण सुधारायला हवे, महत्त्वाचे झेल पकडायला हवेत आणि धावा रोखायला हव्यात, म्हणजे भारताला विजय मिळवणे सोपं जाईल”, असे गावसकर म्हणाले.

दुसऱ्या सामन्यात भारताचा पराभव

नाणेफेकीनंतर भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. भारतीय संघाला १७० धावांवर रोखण्यात विंडीजचे गोलंदाज यशस्वी झाले. शिवम दुबेचा अपवाद वगळता एकही भारतीय फलंदाज त्यांच्या लौकिकाला साजेशी खेळी करु शकला नाही. सलामीवीर रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत, जाडेजा हे फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या शिवम दुबेने आपलं टी-२० क्रिकेटमधलं पहिलं अर्धशतक ठोकत महत्वपूर्ण भागीदारी रचली आणि भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.

या आव्हानाचा पाठलाग करताना सिमन्स आणि एविन लुईस यांनी विंडीजला चांगली सुरुवात करुन दिली. त्यांनी ७३ धावांची भागीदारी केली. एविन लुईस आणि शिमरॉन हेटमायर यांना माघारी धाडण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी ठरले. मात्र सिमन्सवर अंकुश लावण्यात त्यांना अपयश आलं. सिमन्सने या सामन्यात नाबाद ६७ धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर, जाडेजाने १-१ बळी घेतला.