जून महिन्यात इंग्लंडमध्ये पार पडलेल्या चॅम्पियन्स करंडकात भारतीय संघ विजेतेपदाचा दावेदार होता. फॉर्मात असलेल्या भारतीय संघाची कामगिरी पाहता भारत अंतिम सामन्यात पोहचून आपल्या प्रतिस्पर्धी संघावर सहज मात करेल असा अंदाज सर्व क्रीडारसिकांनी वर्तवला होता. याप्रमाणे साखळी सामन्यात भारताने आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला मोठ्या फरकाने हरवत चांगली सुरुवातही केली होती. मात्र यानंतर पाकिस्तानने आपल्या कामगिरीत सुधारणा करत इंग्लंडला घरच्या मैदानावर हरवत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.

साखळी सामन्यातील भारतीय संघाची कामगिरी पाहता अंतिम सामन्यात भारत पुन्हा बाजी मारेल असा सर्वांचा अंदाज होता. मात्र प्रत्यक्ष मैदानात घडलं मात्र नेमकं उलटं. सरफराज अहमदच्या पाकिस्तानी संघाने भारतावर मात करच चॅम्पियन्स करंडक आपल्या खिशात घातला. पाकिस्तान संघाचे व्यवस्थापक तलत अली यांच्यामते रवी शास्त्री, सुनील गावसकर यांच्यासारख्या माजी खेळाडूंमुळेच पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीत भारताला हरवू शकला.

“शास्त्री आणि गावसकर हे जवळपास प्रत्येक मुलाखतीत भारतीय संघाला प्रोत्साहन देण्याचं काम करत होते. मात्र त्यांच्या या विश्लेषणात त्यांनी पाकिस्तानला कमी लेखण्याची चूक केली. भारत अंतिम सामन्यात विजय मिळवेल असं या दोन्ही खेळाडूंनी जणू ठरवूनच टाकलं होतं. यावेळी आम्ही शांत राहत आमच्या खेळाडूंना मैदानात चांगल्या कामगिरीने भारताला प्रत्युत्तर देण्याचा सल्ला दिला, आणि ज्याचा आम्हाला चांगलाच फायदा झाला.” ‘Cricbuzz’ या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत तलत अली बोलत होते.

अंतिम सामन्याआधी काही प्रमाणात नशिबानेही आम्हाला साथ दिली. नाणेफेक जिंकल्यानंतर विराट कोहलीने आम्हाला फलंदाजीचं निमंत्रण देणं हे थोडं आश्चर्यकारक होतं. कारण चांगली गोलंदाजी हे आमचं प्रमुख अस्त्र होतं. एकदा आम्ही मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी झालो, की आमचे गोलंदाज भारताला नक्कीच अडचणीत आणतील याचा आम्हाला विश्वास होता. त्याप्रमाणे खेळ करत आम्ही अंतिम फेरीत भारताला धक्का दिल्याचं अली यांनी म्हणलं आहे.

फखार झमानने केलेलं शतक आणि त्याला मोहम्मद हाफिजने अर्धशतक करुन दिलेली साथ या जोरावर पाकिस्तानने ४ गड्यांच्या मोबदल्यात ३३८ धावांची मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव पत्त्याच्या बंगलाप्रमाणे कोसळला. मोहम्मद आमिरने भारताच्या सलामीच्या फलंदाजांना माघारी धाडत, भारताच्या आक्रमणाची हवाच काढून टाकली.