ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली असून यामधून हिटमॅन रोहित शर्माला वगळण्यात आलं आहे. रोहित शर्माला दुखापत झाल्याने संघात स्थान देण्यात आलं नसल्याचं सांगण्यात आलं आहे. पण रोहित शर्माचा मुंबई इंडियन्ससाठी सराव करतानाचे फोटो आणि व्हिीओ समोर आल्यानंतर लिटिल मास्टर सुनील गावसकर यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

१० नोव्हेंबरला आयपीएलचा अंतिम सामना झाल्यानंतर १४ नोव्हेंबपर्यंत भारताचे खेळाडू ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहेत. या दौऱ्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध तीन एकदिवसीय, चार कसोटी आणि तीन टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. विराट कोहली संघाचं नेतृत्व करणार असून के एल राहुलला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. बीसीआयने रोहित शर्माच्या दुखापतीवर आपण लक्ष ठेवून असणार आहोत अशी माहिती दिली आहे.

किंग्स इलेव्हन पंजाबविरोधातील सुपर ओव्हरमध्ये डाव्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे रोहित शर्मा गेले दोन सामने खेळू शकला नाही. त्यातच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी नाव जाहीर न झाल्याने आश्चर्य व्यक्त होऊ लागलं. विशेष म्हणजे मयांक अग्रवालला देखील दुखापत झालेली असताना त्याचं नाव जाहीर झालं आहे.

भारतीय संघाची घोषणा झाल्याच्या काही तासानंतर मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा नेटमध्ये सराव करत असतानाचे फोटो शेअर करण्यात आले. एक व्हिडीओदेखील शेअर करण्यात आला असून रोहित यामध्ये बॅटिंग करताना दिसत आहे. यानंतर गावसकर यांनी रोहितच्या चाहत्यांना दुखापतीसंबंधी योग्य माहिती मिळाली पाहिजे असं म्हटलं आहे.

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गावसकर यांनी म्हटलं आहे की, “रोहित शर्माला नेमकी काय दुखपात आहे याची मला माहिती नाही, पण जर ती गंभीर होती तर त्याने सराव करण्याची गरज नव्हती. मला वाटतं थोडी पारदर्शकता आणि माहिती मिळाल्यास सर्वांनाच मदत होईल. भारतीय क्रिकेट चाहत्यांना हे जाणून घेण्याचा इतरांपेक्षा जास्त हक्क आहे”.

“मुंबई इंडियन्स येथे जिंकण्यासाठी आली असून त्यांना माघार घ्यायची नाही हे समजू शकतो. आपल्या विरोधकांना त्यांना कोणताही मानसिक फायदा द्यायचा नाही. पण आपण भारतीय संघाबद्दल बोलत आहोत. मयांक अग्रवालदेखील खेळला नाही आहे. दोन महत्त्वाच्या खेळाडूंसोबत नेमकं काय सुरु आहे हे भारतीय क्रिकेट चाहत्यांना कळलं पाहिजे,” असं मत सुनील गावसकर यांनी व्यक्त केलं आहे.

टी२० संघ– विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अग्रवाल, लोकेश राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, वरुण चक्रवर्ती

कसोटी संघ– विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज

एकदिवसीय संघ– विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर