ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताची फलंदाजी डगमगली होती. सलामीवीर लोकेश राहुल पहिल्या डावात सपशेल अपयशी ठरला. त्याच्या या खेळीवर भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर चांगलेच नाराज झाले आहेत. अॅडलेड कसोटीत दुसऱ्या डावात जर लोकेश राहुल चांगला खेळला नाही तर त्याला दुसऱ्या कसोटीत संघामध्ये घेऊ नका असं मत गावसकर यांनी व्यक्त केलं आहे.

“जर दुसऱ्या डावात लोकेश राहुलने चांगली खेळी केली नाही तर त्याला पुढच्या कसोटी सामन्यात संघात जागाच देऊ नका. त्याने त्याच्या खेळातला आत्मविश्वास गमावला आहे. एक काळ असा होता की, राहुलच्या फटक्यांमध्ये एक वेगळा आत्मविश्वास जाणवायचा. मात्र आता तसं काही वाटत नाही. त्याच्या खेळात सातत्य राहिलं नाही, ऑफ स्टम्प बाहेर जाणाऱ्या चेंडूला बॅट लावण्याचा मोह तो अजुनही आवरु शकत नाही. आपल्या या चुकांमध्ये सुधारणा करण्याचीही त्याला गरज वाटत नाहीये.” गावसकर आज तक वाहिनीशी बोलत होते.

लोकेश राहुलने या वर्षात आतापर्यंत 11 कसोटी सामने खेळले आहेत. भारतीय संघातील एकाही खेळाडूला यंदाच्या वर्षात लोकेश राहुल इतक्या संधी मिळालेल्या नाहीयेत. मात्र इतक्या संधीनंतरही राहुलने 422 धावा केल्या आहेत. या सामन्यांमध्ये राहुलने फक्त एक शतक व एक अर्धशतक झळकावलं आहे. अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यात केलेलं अर्धशतक व इंग्लंड दौऱ्यातील अखेरच्या कसोटी सामन्यात केलेलं शतक वगळता लोकेश राहुलने यंदाच्या वर्षात निराशाजनक कामगिरी केली आहे.