नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटसाठी महेंद्रसिंह धोनीने अमूल्य योगदान दिलेले असून तुम्ही त्याची गणना करू शकत नाही, अशा शब्दांत माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी धोनीची स्तुती करतानाच त्याच्या विरोधकांनादेखील खडे बोल सुनावले.

गावस्कर म्हणाले, ‘‘धोनीसारख्या सभ्य गृहस्थाला कृपया मोकळे सोडावे व त्यानंतर त्याच्या अशाच प्रकारच्या खेळाचा आनंद लुटावा, अशी विनंती आहे. तो आता त्याच्या सर्वोत्तम फार्मात नाही आहे, त्याशिवाय त्याचे वयही वाढते आहे. त्यामुळे वयानुसार त्याच्या कामगिरीत घट होणे साहजिकच आहे. मात्र कठीण परिस्थितीत आजही तो संघासाठी धावून येत आहे.’’

‘‘क्षेत्ररक्षण करतानाही तो गोलंदाजांना सतत मार्गदर्शन करत असतो. फलंदाज कशा प्रकारे खेळत आहे किंवा तो आता कोणता फटका मारणार आहे, हे धोनीला सहज कळते. त्याशिवाय विराट कोहली सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असताना त्याला विरुद्ध दिशेवरील खेळाडूशी किंवा गोलंदाजाशी संवाद साधणे कठीण जात असल्यास धोनीच कर्णधाराची भूमिका सांभाळतो. स्वत: कोहलीही धोनीवर पूर्णपणे विश्वास दाखवून संघासाठी आवश्यक ते बदल करण्यासाठी होकार दर्शवतो, त्यामुळेच धोनीच्या योगदानावर तुम्ही कधीच प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही,’’ असेही गावस्कर यांनी सांगितले.

याव्यतिरिक्त, हार्दिक पंडय़ा व लोकेश राहुल यांच्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर मात्र गावस्करांनी मौन बाळगले. ‘‘याविषयी बीसीसीआयनेच अंतिम निर्णय घेतला पाहिजे, त्यामुळे मी भाष्य न केलेलेच बरे,’’ असे ते म्हणाले.