मिताली राज आणि रमेश पोवार हा वाद सध्या गाजत आहे. या वादाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या दरम्यान आता भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी मुंबईच्या खेळाडूंवर BCCI ची निवड समिती नेहमीच अन्याय करते असे वक्तव्य करत एका नव्या वादाला तोंड फोडले आहे.

BCCI ची संघ निवड प्रक्रिया ही कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकते. निवड समितीच्या अनेक निवडींवर माजी क्रिकेटपटू आणि जाणकार उघडपणे नाराजी व्यक्त करतात. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत मुंबईकर सिद्धेश लाड याने उत्तम कामगिरी करूनही त्याला भारत अ संघात स्थान देण्यात आलेले नाही. याबाबत BCCI च्या निवड समितीवर गावसकर यांनी टीका केली आहे.

मुंबईकर सिद्धेश लाड

 

स्थानिक क्रिकेटमध्ये सिद्धेशची कामगिरी उत्तम झाली. त्याच्या कामगिरीत सातत्य होते. संघ जेव्हा जेव्हा अडचणीत सापडला, तेव्हा सिद्धेशने मुंबईचा डाव सावरला. इतकी उल्लेखनीय कामगिरी करूनही सिद्धेशला भारत अ संघात स्थान देण्यात आले नाही हे दुर्दैवी आहे, असे गावसकर म्हणाले.

याचबरोबर गावसकर यांनी भूतकाळातील एक उदाहरण देत BCCI ला शालजोडीतील फटकारे लगावला. मुंबईचा अमोल मुझुमदार हा चांगला खेळाडू होता.

 

सचिन तेंडुलकर आणि अमोल मुझुमदार

 

अमोलचा खेळ उल्लेखनीय होता. पण भारतीय निवड समितीने त्याला कधीही न्याय दिला नाही. त्यामुळे त्याची कारकीर्द संपली. आता सिद्धेशचीही अमोल मुझुमदारसारखी कारकीर्द संपू नये, अशी आशा आहे, असे ते म्हणाले.