IND vs ENG : चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरु आहे. दुसऱ्या सामन्यासाठी असणाऱ्या खेळपट्टीवर चर्चा सुरु आहे. चेपॉकची खेळपट्टी पहिल्या दिवसांपासूनच फिरकीला मदत करणारी असल्यामुळे अनेक विदेशी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली. इंग्लंड संघाचे माजी कर्णधार मायकल वॉन यानं खेळपट्टीवरुन नाराजी व्यक्त केल्यानंतर शेन वॉर्न यानं आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. चेन्नईच्या या खेळपट्टीवर आता समालोचक सुनील गावसकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाला की, ‘खेळपट्टीवरुन होणारा वाद निरर्थक आहे. इंग्लंड संघातील फलंदाजांनी जबाबदारीनं फलंदाजी केली नसल्यामुळे सामन्यात भारतीय संघानं वर्चस्व गाजवलं आहे.’

सामन्यादरम्यान समालोचन करताना सुनील गावसकर यांनी इंग्लंड संघावर टीकास्त्र डागलं आहे. इंग्लंड संघाची गोलंदाजी आणि फलंदाजीवर गावसकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. गावसकर म्हणाले की, ‘भारताने दुसऱ्या डावात इंग्लंडच्या पहिल्या डावातील धावसंख्येला मागे टाकलं आहे. याचाच अर्थ खेळपट्टी फलंदाजीसाठी तितकी खराब नाही. एकतर इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांना या खेळपट्टीचा पूर्ण फायदा घेता आला नाही. किंवा भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या फंलदाजापेक्षा चांगली गोलंदाजी केली आहे.’

म्हणून गावसकर आलेत ट्रेंडिगमध्ये –
गावसकर यांनी इंग्लंडच्या फलंदाजांना समालोचन करताना खूप वेळा ट्रोल केलं. त्यामुळे गावसकर सोशल मीडियावर ट्रेंडही करत आहेत. स्टुअर्ट ब्रॉड गोलंदाजी करण्यासाठी आल्यानंतर गावसकरांनी केलेलं वक्तव्य खूप चर्चेत आहे. गावसकर यांच्यासोबत समालोचन करणारा कार्तिक म्हणाला की, गोलंदाजाचं आक्रमण आता ब्रॉड संभाळणार आहे. यावर गावसकरांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे. गावसकर म्हणाले की, “ओह, क्‍या वह इस मैच में खेल रहे हैं?” खेळपट्टीवर बोलताना गावसकर म्हणाले की, “इंग्लंडमध्ये खूप घास असमारी खेळपट्टी तयार केली जाते. जसं जनावरांना खाण्यासाठी घास पेरला असेल. त्यावेळी कोणी तक्रार करत नाही”