बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची धुरा भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या हाती आल्यापासून अनेक महत्वाचे बदल घडून आले आहेत. दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यापासून अनेक महत्वाच्या गोष्टींमध्ये बदल घडलेला दिसत आहे. मात्र नवीन संविधानानुसार अध्यक्षपदी सौरव गांगुली आणि सचिवपदी जय शहा यांनी रहायचं की नाही याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात पुढील महिन्यात घेणार आहे. बीसीसीायच्या नवीन संविधानानुसार, कोणत्याही राज्य संघटनेत एखाद्या व्यक्तीने ३ वर्षांच्या दोन टर्म पूर्ण केल्या असतील…तर त्याला पुन्हा कोणतही पद भूषवताना ३ वर्षांचा ‘कुलिंग ऑफ’ कालावधी घ्यावा लागतो, म्हणजेच पुढील ३ वर्ष त्या व्यक्तीला कोणत्याही पदावर राहता येत नाही. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याआधी सौरव गांगुली सलग दोन टर्म बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून काम पाहत होता. आपली दुसरी टर्म संपण्यासाठी काही महिने शिल्लक असताना गांगुलीने सर्वोच्च न्यायालयात आपल्याला अधिक काळ काम करता यावं यासाठी याचिका दाखल केली होती.

भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांच्या मते सौरव गांगुलीने २०२३ विश्वचषकापर्यंत बीसीसीआयच्या अध्यक्षपदी काम करण्याची गरज आहे. कर्णधार या नात्याने सौरवने भारतीय संघासाठी चांगली कामगिरी केली याचप्रमाणे BCCI च्या कामकामाजतही तो चांगली कामगिरी करेल. “सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सध्या भारतीय क्रिकेट एका विचीत्र अवस्थेत सापडलं आहे. सर्वोच्च न्यायालयात इतरही अनेक महत्वाच्या केस असतील याची मला जाणीव आहे. परंतू भारतीय क्रिकेट चाहते गांगुलीच्या याचिकेवर काय निर्णय घेतो याची आतुरतेने वाट पाहत आहेत. माझं मत विचाराल तर सौरवने २०२३ पर्यंत बीसीसीआयच्या अध्यक्षपदी कायम रहावं, पण अर्थात न्यायालय काय ठरवतं हे देखील पहावं लागेल. ज्या पद्धतीने सौरवने आपल्या कर्णधारपदाच्या काळात भारतीय संघाला सर्वोच्च स्थानावर नेवून ठेवलं त्याचपद्धतीने बीसीसीआयच्या कारभारातही सौरवसारख्या अनुभवी माणसाची गरज आहे.” गावसकर Mid Day शी बोलत होते.

बीसीसीआयने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय १७ ऑगस्ट रोजी निर्णय घेणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विरोधात गेल्यास गांगुली आणि जय शहा यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल. सध्या बीसीसीआय आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे. आयसीसीने ऑस्ट्रेलियात आयोजित टी-२० विश्वचषक पुढे ढकलल्यानंतर बीसीसीआय १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर या काळात युएईमध्ये आयपीएलचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे.