भारतीय संघाचा माजी फिरकीपटू सुनिल जोशीने, संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. भारतीय संघात फिरकीपटूंना मार्गदर्शन करणाऱ्याची गरज असल्याचं म्हणत सुनिल जोशीने प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आपला अर्ज दाखल केला आहे. याआधी माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचं काम पाहिलं आहे.

“होय, मी गोलंदाजी प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल केला आहे. गेली दोन ते अडीच वर्ष मी बांगलादेशच्या संघाला प्रशिक्षण देतो आहे. मी आता पुढच्या आव्हानासाठी सज्ज आहे. भारतीय संघात विशेषकरुन फिरकीपटूंना मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षक नाहीये, त्यामुळे माझ्या अर्जाचा सकारात्मक विचार केला जाईल अशी मला आशा आहे.” सुनिल जोशी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत होता.

“सध्याच्या घडीला अनेक क्रिकेट संघ, गोलंदाजीमध्ये फिरकीपटूंना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष सल्लागाराची नेमणूक करतात. माझ्यामते भारतीय संघालाही याची गरज आहे. माझ्यामते ही काळाची गरज आहे, मग ही संधी मला मिळो किंवा अन्य कोणालाही….पण भारतीय संघात फिरकीपटूंना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष प्रशिक्षकाची गरज आहे”, सुनिल जोशी बोलत होता. २०१९ विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर सुनिल जोशीचा बांगलादेश क्रिकेट बोर्डासोबतचा करार संपुष्टात आला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याआधी सुनिल जोशीने १९९६-२००१ पर्यंत भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. १५ कसोटी सामन्यात सुनिल जोशीच्या नावावर ४१ बळी जमा आहेत, तर वन-डे क्रिकेटमध्ये सुनिलने ६९ फलंदाजांना बाद केलं आहे. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये सुनिल जोशीच्या नावावर १६० सामन्यात ६१५ बळी जमा आहेत.