भारतीय खेळाडूंची पाच सुवर्णासह एकूण १५ पदकांची कमाई

पुणे : पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलात झालेल्या ५२व्या आशियाई शरीरसौष्ठव क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या सुनीत जाधवने ‘आशिया-श्री’ किताबावर नाव कोरले. भारताच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत पाच सुवर्ण, सहा रौप्य व चार कांस्यपदकांना गवसणी घातली. स्पर्धेच्या इतिहासातील भारताची ही आजपर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली.

पुरुषांच्या ९० किलो वजनी गटात सुनीतने सुवर्णपदक मिळवले असले तरी त्याला लवकरच ‘जागतिक-श्री’ म्हणूनही नावारूपास यायचे आहे. सुनीतची पत्नी स्वप्नालीने पतीला पाठिंबा देण्यासाठी स्वत:ची नोकरी सोडून त्याच्या आहारावर तसेच तंदुरुस्तीवर लक्ष दिले.

भारताला दुसरे सुवर्ण नितीन म्हात्रेने पुरुषांच्या ५५ किलो वजनी गटात मिळवून दिले. चार वेळचा ‘भारत-श्री’ व एकदा ‘जागतिक-श्री’ विजेतेपदावर नाव कोरणाऱ्या नितीनने १४ वर्षांच्या मेहनतीनंतर आशियातील विजेतेपदाला गवसणी घातली. भास्करन (६० किलो), बॉबी सिंग (८० किलो), यतिंदर सिंग (८५ किलो) यांनीदेखील सुवर्णपदकाची कमाई केली.

गौरव भंडारी (६० किलो), हरी बाबू (६५ किलो), सी. राहुल (७० किलो), जयप्रकाश (७५ किलो), महेंद्र पागडे (१०० किलो), अक्षय मोगारकर (+१०० किलो) यांनी रौप्यपदक मिळवत भारताच्या पदकतालिकेत मोलाची भर घातली.

नितीन म्हात्रेने ज्या गटात सुवर्णपदक मिळवले त्याच गटात भारताच्याच एल. नेताने (५५ किलो) कांस्यपदक प्राप्त केले. त्याशिवाय पोथिना कृष्णा (७५ किलो), किरण पाटील (१०० किलो) आणि जुबेर शेख (+१०० किलो) यांनी कांस्यपदक पटकावले.

‘‘मागील काही वर्षांत भारताला हा बहुमान मिळवून देण्यात अनेकदा अपयश आले, मात्र शेवटी हा पराक्रम करून दाखवल्यामुळे मला फार आनंद होत आहे. किंबहुना माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदी क्षणांपैकी हा एक असून हे विजेतेपद मी माझी पत्नी, भारतीय शरीरसौष्ठव महासंघ आणि चेतन पठारे यांना समर्पित करतो.’’

-सुनीत जाधव