भारतीय संघ लवकरच आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात रंगणारा दुसरा कसोटी सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. हा कसोटी सामना भारत आणि बांगलादेश या दोनही संघांचा पहिला दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बांगलादेश क्रिकेट मंडळासमोर (बीसीबी) याबाबतचा प्रस्ताव ठेवला होता. बांगलादेश क्रिकेट मंडळाने याबाबत होकार दर्शवला असून भारतात २२ नोव्हेंबरला पहिल्यांदाच दिवस-रात्र कसोटी सामन्याचा आनंद चाहत्यांना लुटता येणार आहे.

क्रिकेट जगतात कसोटी क्रिकेट जगवण्याचे विविध प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे मात्र टी २० स्पर्धांना पेव फुटले आहे. टी २० क्रिकेट हा सर्वात प्रसिध्द क्रिकेट फॉरमॅट झाला आहे. त्यामुळे IPL पासून ते विविध लीगपर्यंत सर्वत्र टी २० क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या जातात. तशातच आता नवा आणि वेगळा असा टी-10 चा पर्यायही उपलब्ध करून देण्यात येत आहे. दुबईमध्ये टी-10 क्रिकेट लीग (T10 Cricket League) ही स्पर्धा सुरू करण्यात येणार आहे. १४ नोव्हेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

या स्पर्धेसाठी एकूण ८ संघ आहेत. स्पर्धेमधील सहभागी संघ असलेला दिल्ली बुल्स या संघाने नुकतेच आपली जर्सी, थीम साँग आणि ब्रँड अ‍ॅम्बेसेडर यांची घोषणा करण्यात आली. दुबईमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी आपल्या जर्सीचे अनावरण केले. महत्त्वाची बाब म्हणजे दिल्ली बुल्स या संघाने ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अभिनेत्री सनी लिओनीची निवड केली आहे. त्यामुळे प्रथमच सनी लिओनी क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे.

विश्वचषक २०१९ चा विजेता ठरलेल्या इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन हा दिल्ली संघाचे नेतृत्व करणार आहे. या संघात पाकिस्तानचा अनुभवी शोएब मलिक, अफगाणिस्तानचा अष्टपैलू मोहम्मद नबी, भारताचा वेगवान गोलंदाज जहीर खान इत्यादी खेळाडूंचा समावेश आहे.