४ षटकांत ९ धावा देत २ बळी; सनरायझर्स हैदराबादचा किंग्ज इलेव्हन पंजाबवर विजय

मुस्ताफिझूर रहमानच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर सनरायझर्स हैदराबादने किंग्ज इलेव्हन पंजाब संघावर दणदणीत विजय मिळवला. सनरायझर्सने पंजाबला १४३ धावांतच रोखले. डेव्हिड वॉर्नरने धडाकेबाज खेळीसह हैदराबादने विकेट्स राखून लक्ष्य गाठले.

माफक आव्हानाचा पाठलाग करताना वॉर्नर आणि शिखर धवन जोडीने ९० धावांची सलामी देत विजयाचा पाया रचला. ३१ चेंडूंत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ५९ धावांची खेळी करुन वॉर्नर बाद झाला. आदित्य तरे भोपळाही फोडू शकला नाही. ४५ धावा करून शिखर बाद झाला. मॉर्गनने २० चेंडूंत २५ धावा केल्या आणि हैदराबादने लक्ष्य गाठले.

तत्पूर्वी, मुस्ताफिझूर रहमानच्या अफलातून स्पेलपुढे पंजाबच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. भुवनेश्वर कुमारने मुरली विजयला बाद करत चांगली सुरुवात केली. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात मनन व्होरा धावचीत झाला. निर्धाव षटक टाकत मुस्ताफिझूरने पंजाबच्या धावगतीला वेसण घातली. मॉझेस हेन्रिकने डेव्हिड मिलरला तंबूत परतावले. धोकादायक ग्लेन मॅक्सवेलला हेन्रिकने बाद केले. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या शॉन मार्शला मुस्ताफिझूरने बाद केले. मार्शने ३४ चेंडूंत ४० धावांची खेळी केली. वृद्धिमान साहाच्या जागी संधी मिळालेल्या निखिल नाईकने २२ धावा केल्या. शेवटच्या षटकांत मुस्ताफिझूरने त्याला बाद केले. अक्षर पटेलने १७ चेंडूंत १ चौकार आणि ३ षटकारासह ३६ धावांची उपयुक्त खेळी केली. मुस्ताफिझूरने ४ षटकांत अवघ्या ९ धावा देत २ बळी टिपले. हेन्रिकने २ बळी घेत त्याला चांगली साथ दिली.

संक्षिप्त धावफलक

किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकांत ६ बाद १४३ (शॉन मार्श ४०, अक्षर पटेल ३६; मुस्ताफिझूर रहमान २/९, मॉझेस हेन्रिक २/३३) पराभूत विरुद्ध : सनरायझर्स हैदराबाद : १७.५ षटकांत ५ बाद १४६ (डेव्हिड वॉर्नर ५९, शिखर धवन ४५; मोहित शर्मा १/२०)

सामनावीर : मुस्ताफिझूर रहमान