इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या यंदाच्या पर्वातील सर्वात बलाढय़ संघ म्हणून सनरायजर्स हैदराबाद उदयास येत आहे; परंतु मधल्या फळीची चिंता त्यांना तीव्रपणे भेडसावत आहे. सोमवारी किंग्ज इलेव्हन पंजाबशी सामना करताना दोन्ही संघांना पुन्हा विजयपथावर परतण्याचे आव्हान समोर असेल.

हैदराबाद आणि पंजाब या दोन्ही संघांनी पाचपैकी तीन विजय मिळवत प्रत्येकी सहा गुण कमावले आहेत. मात्र सरस धावगतीच्या आधारे हैदराबादचा संघ ‘आयपीएल’ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे, तर पंजाबचा संघ पाचव्या स्थानावर आहे.

यंदाच्या हंगामातील पहिल्या तीन सामन्यांत डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांच्या शतकी भागीदाऱ्यांच्या बळावर हैदराबादने सर्वच संघांवर दडपण आणले होते. मात्र पुढील दोन सामन्यांत ते अपयशी ठरताच मधल्या फळीचे कच्चे दुवे समोर आले. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात विजय शंकर, मनीष पांडे, दीपक हुडा आणि युसूफ पठाण अपेक्षांची पूर्तता करण्यात अपयशी ठरले. मुंबईचे विजयासाठीचे १३७ धावांचे लक्ष्य पेलताना पदार्पणवीर अल्झारी जोसेफच्या गोलंदाजीवर हैदराबादच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली.

हैदराबादच्या वेगवान माऱ्याची भिस्त भुवेनश्वर कुमार, संदीप शर्मा आणि सिद्धार्थ कौल यांच्यावर आहे, तर अफगाणिस्तानची फिरकी जोडगोळी रशीद खान आणि मोहम्मद नबी मधल्या षटकांमध्ये प्रतिस्पध्र्यावर दडपण आणण्यात पटाईत आहे.

दुसरीकडे, पंजाबचा संघ चेन्नईचे १६१ धावांचे लक्ष्य गाठू शकला नाही. लोकेश राहुल (५५), सर्फराज खान (६७) यांच्या अर्धशतकांनंतरही त्यांना ५ बाद १३८ धावाच करता आल्या. ख्रिस गेलला पुन्हा सूर गवसला, तरच पंजाबला धावांचा डोंगर उभारता येईल. याशिवाय मयांक अगरवाल, मनदीप सिंग आणि डेव्हिड मिलर यांनी अधिक जबाबदारीने फलंदाजी करण्याची गरज आहे.

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी अद्याप आपली छाप पाडू शकलेला नाही. कर्णधार रविचंद्रन अश्विन आघाडीवर राहून नेतृत्व करीत आहे. त्याला सॅम करन, मुरुगन अश्विन आणि अँड्रय़ू टाय यांची पुरेशी साथ मिळत आहे.

संघ : किंग्ज इलेव्हन पंजाब : रविचंद्रन अश्विन (कर्णधार), सॅम करन, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, निकोलस पूरन, मोझेस हेंड्रिक्स, हार्डस व्हिलजोएन, दर्शन नळकांडे, करुण नायर, सर्फराज खान, अर्शदीप सिंग, अग्निवेश अयाची, हरप्रीत ब्रार, ख्रिस गेल, मुरुगन अश्विन, अँड्रय़ू टाय, लोकेश राहुल, अंकित राजपूत, मनदीप सिंग, सिमरन सिंग, मयांक अग्रवाल, मुजीब उर रहमान, डेव्हिड मिलर.

सनरायजर्स हैदराबाद : केन विल्यम्सन (कर्णधार), मनीष पांडे, मार्टिन गप्टिल, रिकी भुई, डेव्हिड वॉर्नर, दीपक हुडा, मोहमद नबी, युसूफ पठाण, शाकिब अल हसन, अभिषेक शर्मा, विजय शंकर, श्रीवत्स गोस्वामी, जॉनी बेरिस्टो, वृद्धिमान साहा, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, भुवनेश्वर कुमार, राशिद खान, बॅसिल थम्पी, बिली स्टॅनलेक, टी. नटराजन, संदीप शर्मा, शाहबाझ नदीम.