देशभरात पसरलेल्या करोना विषाणूचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. बीसीसीआयनेही २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएलची स्पर्धा १५ एप्रलिपर्यंत पुढे ढकलली आहे. मात्र सध्याच्या घडीला देशातली परिस्थिती लक्षात घेता…१५ एप्रिलनंतरही आयपीएल सुरु होईल की नाही याची खात्री देता येत नाही. आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला कोट्यवधी रुपयांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. यासाठी बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आयपीएल खेळवता येईल का याचा विचार करत आहे.

सध्याच्या खडतर काळात अनेक आजी-माजी खेळाडू, उद्योगपती हे सरकारी यंत्रणांना मदतकार्यासाठी पुढे येत आहेत. अशातच आयपीएलमधल्या सनराईजर्स हैदराबाद संघाने करोनाविरुद्ध लढ्यात मदतकार्यासाठी १० कोटींचा निधी दिला आहे.

२०१६ साली डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली हैदराबाद संघाने आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होतं. विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, गौतम गंभीर, पी.व्ही.सिंधू, बजरंग पुनिया, राहुल आवारे, सुनिल गावसकर, अनिल कुंबळे, शिखर धवन, मिताली राज, हिमा दास, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली यासारख्या आजी-माजी क्रिडापटूंनी करोनाविरुद्ध लढ्यात आर्थिक मदत केली आहे.