सलग तीन विजयांसह सावरणाऱ्या सनरायझर्स हैदराबादचे मंगळवारी होणाऱ्या आयपीएल लढतीत झगडणाऱ्या रायझिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्ध पारडे जड मानले जात आहे. प्रारंभीच्या दोन सामन्यांतील अपयशानंतर हैदराबादचे नशीब पालटले आणि त्यांनी मुंबई इंडियन्स (७ विकेट्स राखून), गुजरात लायन्स (१० विकेट्स राखून) आणि किंग्ज इलेव्हन पंजाब (५ विकेट्स राखून) यांच्याविरुद्ध दिमाखदार विजय मिळवले.
पाच सामन्यांत सहा गुणांसह आयपीएल गुणतालिकेत सध्या हैदराबादचा संघ चौथ्या स्थानावर आहे. मात्र महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील पुण्याच्या संघाला पाच सामन्यांपैकी एकमेव विजयासह फक्त २ गुण कमवता आले असून, ते सातव्या स्थानावर आहेत.
युवराज सिंग, आशीष नेहरा आणि केन विल्यमसन यांच्यासारखे दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे खेळत नसले तरी हैदराबादची सांघिक ताकद उत्तमपणे दिसून येत आहे. हैदराबादचा संघनायक आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर प्रत्येक सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करीत आहे. पाच सामन्यांत चार अर्धशतकांसह २९४ धावा काढून तो सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र पहिल्या तीन सामन्यांतील खराब कामगिरीनंतर सलामीवीर शिखर धवनला सूर गवसल्याने हैदराबादच्या चिंता मिटल्या आहेत. धवनने गुजरातविरुद्ध नाबाद ५३ आणि पंजाबविरुद्ध ४५ धावा काढल्या. याशिवाय मोझेस हेन्रिक्स, ईऑन मॉर्गन आणि यष्टिरक्षक नमन ओझा या फलंदाजांनीही महत्त्वाचे योगदान दिले आहे. नेहराच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमार हैदराबादच्या वेगवान माऱ्याचे नेतृत्व करीत आहे. पाच सामन्यांत ८ बळी घेणारा भुवी यंदाच्या हंगामात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेशचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रेहमान टिच्चून गोलंदाजी करीत आहे. तोसुद्धा गोलंदाजांच्या यादीत ७ बळींसह चौथ्या स्थानावर आहे. तसेच बरिंदर सरण, दीपक हुडा आणि बिपुल शर्मा प्रभावी गोलंदाजी करीत आहेत.
दुसरीकडे पुण्याला संघरचना अचूक न झाल्यामुळे विजयापासून वंचित राहावे लागत आहे. ही गोष्ट प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगनेही मान्य केली आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएल हंगामाचा शानदार प्रारंभ केल्यानंतर गुजरात, पंजाब, बंगळुरू आणि कोलकाता या चार संघांविरुद्ध पुण्याने हार पत्करली आहे. त्यामुळे संघाला विजयपथावर पुन्हा आणण्यासाठी धोनी उत्सुक आहे.
बंदी घालण्यात आलेल्या चेन्नई सुपर किंग्जला अमाप यश धोनीने मिळवून दिले होते. मात्र नव्या संघात विजयाचे तेच सूत्र धोनीला अमलात आणता आलेले नाही. स्टीव्ह स्मिथ, फॅफ डू प्लेसिस, अजिंक्य रहाणे आणि थिसारा परेरा यांच्यासारख्या खेळाडूंचा समावेश असतानाही पुण्याचे अपयश हे आश्चर्यकारक मानले जात आहे. दुखापतग्रस्त केव्हिन पीटरसनच्या माघारीमुळेही पुण्याला धक्का बसला आहे. रहाणे आणि प्लेसिस फॉर्मात आहेत, मात्र स्मिथ अपेक्षित कामगिरी करू शकलेला नाही. पुण्याचे अपयश हे गोलंदाजीतून प्रामुख्याने दिसून येत आहे. वेगवान गोलंदाज इशांत शर्मा ट्वेन्टी-२०मध्ये आत्मविश्वासाने गोलंदाजी करू शकलेला नाही. त्यामुळे परेरा आणि अॅल्बी मॉर्केल यांच्यावरच वेगवान माऱ्याची भिस्त आहे. मध्यमगती गोलंदाज रजत भाटिया चांगली कामगिरी करीत आहे. मात्र रविचंद्रन अश्विन, मुरुग्गन अश्विन आणि अंकित शर्मा या फिरकी त्रिकुटाच्या कामगिरीतील सातत्याचा अभाव संघासाठी अपयशी ठरत आहे.

संघ
रायझिंग पुणे सुपरजायंट्स : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), अजिंक्य रहाणे, केव्हिन पीटरसन, फॅफ डू प्लेसिस, स्टिव्हन स्मिथ, मिचेल मार्श, जसकरण सिंग, आर. अश्विन, अंकित शर्मा, अॅल्बी मॉर्केल, इरफान पठाण, इशांत शर्मा, ईश्वर पांडे, थिसारा परेरा, सौरभ तिवारी, आर. पी. सिंग, रजत भाटिया, अंकुश बैन्स, बाबा अपराजित, मुरुगन अश्विन, अशोक दिंडा, दीपक चहर, स्कॉट बोलँड, पीटर हँडस्कॉम्ब आणि अॅडम झम्पा.
सनरायझर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), शिखर धवन, केन विल्यमसन, आदित्य तरे, रिकी भुई, ट्रेंट बोल्ट, मोइसेस हेनरिक्स, अभिमन्यू मिथुन, सिद्धार्थ कौल, मुस्तफिझुर रेहमान, नमन ओझा, कर्ण शर्मा, युवराज सिंग, आशीष नेहरा, टी. सुमन, आशीष रेड्डी, बिपुल शर्मा, बेन कटिंग, भुवनेश्वर कुमार, ईऑन मॉर्गन, विजय शंकर, बरिंदर सरण.
सामन्याची वेळ : रात्री ८ वाजल्यापासून.
थेट प्रक्षेपण : सेट मॅक्स/ एचडी, सोनी सिक्स/ एचडी.