19 September 2020

News Flash

विजयपथावर परतण्याचे हैदराबादचे लक्ष्य

चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सामना; अव्वल स्थानासाठी दोन्ही संघांमध्ये चुरस

चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सामना; अव्वल स्थानासाठी दोन्ही संघांमध्ये चुरस

किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ‘गेल’ वादळामुळे यंदाच्या मोसमात प्रथमच पराभवाचे तोंड पाहावे लागलेल्या सनरायझर्स हैदराबादच्या संघाला रविवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध होणाऱ्या सामन्यात पुन्हा विजयपथावर परतण्याचे आव्हान असणार आहे.

हैदराबाद आणि चेन्नई या दोन्ही संघांच्या खात्यावर प्रत्येकी ६ गुण असून दोन्ही संघ चारपैकी केवळ एकाच सामन्यात पराभूत झाले आहेत. दोन्ही संघांपैकी जो संघ सामना जिंकेल, त्याला साहजिकच गुणतालिकेत अव्वल स्थान मिळेल. हैदराबाद संघाने यंदाच्या मोसमाची सुरुवात शानदार केली असून प्रारंभीचे तिन्ही सामने त्यांनी जिंकले होते. मात्र पंजाबविरुद्ध खेळताना ख्रिस गेलच्या तुफानी शतकी खेळीने त्यांच्या विजयाची परंपरा खंडित झाली. त्या खेळीच्या प्रभावातून आपल्या संघाला आणि विशेषत्वाने गोलंदाजांना बाहेर काढण्याचे काम कर्णधार केन विल्यम्सनला करावे लागणार आहे.

दुसरीकडे चेन्नईला कावेरी जलवाटप वादामुळे पुण्यात सामने खेळावे लागत असूनही त्यांची कामगिरी बहरत आहे. प्रारंभीच्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळाल्यानंतर त्यांनादेखील पंजाबविरुद्ध गेलच्या धडाकेबाज खेळीमुळेच पराभव पत्करावा लागला होता. मात्र त्यानंतर राजस्थान रॉयल्सविरुद्ध वॉटसनने केलेल्या तडाखेबंद शतकी खेळीने चेन्नईला पुन्हा विजयाच्या मार्गावर आणले आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू वॉटसनने फलंदाजीसह गोलंदाजीतदेखील त्याचा करिश्मा दाखवून दिला आहे. त्यामुळे तो चेन्नई संघाचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज तसेच सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. रविवारी वॉटसनला एका अत्यंत संतुलित संघाचा सामना करावा लागणार आहे.

सनरायझर्स हैदराबादचे भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, बिली स्टॅनलेक आणि शाकीब अल हसन हे सर्व गोलंदाज फॉर्मात असून ते सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या शर्यतीत आहेत. कौल ६ बळी मिळवून अग्रस्थानी असून अन्य चौघांनी प्रत्येकी पाच बळी मिळवले आहेत, तर अफगाणिस्तानचा युवा फिरकी गोलंदाज रशीद खान हा काहीसा चाचपडत असून त्याला आतापर्यंत केवळ तीनच बळी मिळवता आले आहेत. मागील सामन्यात गेलने त्याच्या गोलंदाजीवर जोरदार आक्रमण केले होते. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीचे पृथक्करण ४ षटकांत ५५ धावा आणि एक बळी असे बिघडून गेले होते. चेन्नईकडे फलंदाजी खूप खोलपर्यंत असून वॉटसन तळपत असतानाच धोनी आणि अंबाती रायुडूदेखील महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. मात्र ब्राव्हो आणि बिलिंग्जने प्रत्येकी एक अर्धशतकी खेळी केल्यानंतर फारशी चमक दाखवलेली नसून त्यांना पुन्हा चांगली लय प्राप्त  करावी लागणार आहे.

  • सामन्याची वेळ : दुपारी ४ वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2018 1:48 am

Web Title: sunrisers hyderabad vs chennai super kings
Next Stories
1 सावध ऐका पुढल्या हाका!
2 डी’व्हिलियर्सची आतषबाजी!
3 अर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा
Just Now!
X