16 October 2019

News Flash

चेन्नईला चिंता आघाडीच्या फळीची!

सलग तिसरा पराभव टाळण्यासाठी आज सनरायजर्स हैदराबादचे आव्हान

सलग तिसरा पराभव टाळण्यासाठी आज सनरायजर्स हैदराबादचे आव्हान

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जने नेहमीप्रमाणे यंदाही इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) पहिल्या आठपैकी सात सामने जिंकून धडाक्यात सुरुवात केली. मात्र गेल्या दोन लढतींमध्ये पराभव पत्करल्यामुळे चेन्नईची गाडी रुळावरून घसरली आहे. आघाडीच्या फळीचे अपयश हे यामागील मुख्य कारण असल्याने मंगळवारी बलाढय़ सनरायजर्स हैदराबादविरुद्ध होणाऱ्या सामन्यात ते कशी कामगिरी करतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

रविवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नईला अवघ्या एका धावेने पराभव स्वीकारावा लागला. धोनीने दिलेली एकाकी झुंजही चेन्नईला तारू शकली नाही. त्यामुळे सलामीवीर शेन वॉटसन (यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये आतापर्यंत १४७ धावा), फॅफ डय़ू प्लेसिस (१७८) व सुरेश रैना (२०७) या आघाडीच्या तीन फलंदाजांना कामगिरी सुधारण्याची नितांत आवश्यकता आहे. अंबाती रायुडू व केदार जाधव बऱ्यापैकी योगदान देत असले तरी सामना अखेपर्यंत नेऊन संघाला विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरत आहेत. चेपॉकची खेळपट्टी फिरकीपटूंना पोषक असल्यामुळे या सामन्यात हरभजन सिंग किंवा कर्ण शर्मा यांच्यापैकी एकाचे संघात पुनरागमन होऊ शकते.

दुसरीकडे डेव्हिड वॉर्नर (५१७) व जॉनी बेअरस्टो (४४५) यांची धडाकेबाज सलामी जोडी हैदराबादला एकहाती विजय मिळवून देत आहे. त्याशिवाय यंदाच्या हंगामातील चेन्नईविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही या दोघांच्या योगदानामुळे हैदराबादने सरशी साधल्यामुळे चेन्नईला यांच्यासाठी विशेष रणनीती आखावी लागणार आहे.

वॉर्नर-बेअरस्टो वगळता हैदराबादच्या मधल्या फळीनेही निराशा केली आहे. कर्णधार केन विल्यम्सन, मनीष पांडे, दीपक हुडा यांना अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यातच या सामन्यानंतर विश्वचषकाच्या तयारीसाठी बेअरस्टो इंग्लंडला परतणार असल्यामुळे हैदराबादच्या चिंतेत वाढ होणार आहे.

फिरकीपटू राशिद खान आणि धोनी यांच्यातील जुगलबंदी पाहण्यासाठी क्रीडाप्रेमी उत्सुक आहेत. त्याशिवाय भुवनेश्वर कुमार व खलिल अहमदही प्रभावी मारा करत आहेत. त्यामुळे सलग तिसऱ्या विजय मिळवण्यासाठी हैदराबादचे खेळाडू उत्सुक आहेत.

First Published on April 23, 2019 3:25 am

Web Title: sunrisers hyderabad vs csk