कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आज पहिली लढत

तब्बल एक वर्षांच्या बंदीनंतर पुनरागमन करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरच्या कामगिरीकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागलेले आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध होणाऱ्या आजच्या सामन्यात सर्वाच्या नजरा या सनरायजर्स हैदराबादचा सलामीवीर आणि माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नर याच्यावरच राहणार आहेत.

आयपीएलच्या २०१६च्या पर्वात वॉर्नरच्या नेतृत्वाखालीच सनरायजर्स हैदराबादने त्यांचे पहिले विजेतेपद पटकावले होते. तसेच २०१७च्या आयपीएलमध्ये वॉर्नर हा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. मात्र गतवर्षी दक्षिण आफ्रिकेत चेंडूमध्ये फेरफार करण्याच्या प्रकरणात दोषी आढळल्याने त्याच्यासह स्टीव्ह स्मिथवर एक वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्या बंदीतून नुकतेच परतल्यानंतर प्रथमच दोघेही आयपीएलच्या या मोठय़ा स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्याशिवाय वॉर्नरच्या हाताच्या कोपरावरदेखील जानेवारीत शस्त्रक्रिया करण्यात आल्यामुळे त्याच्या तंदुरुस्तीकडेदेखील सर्वाचेच लक्ष राहणार आहे. आयपीएलला येण्यापूर्वी वॉर्नरने त्याच्या सिडनी क्लबकडून खेळताना ७७ चेंडूंमध्ये शतक ठोकून त्याचा आत्मविश्वास आणि धडाका कायम असल्याचे दाखवून दिले आहे.

दरम्यान, गतवर्षीच्या वॉर्नरच्या अनुपस्थितीत संघाला उपविजेतेपदापर्यंत नेणाऱ्या न्यूझीलंडच्या केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखालीच यंदादेखील सनरायजर्सचा संघ खेळणार आहे. वॉर्नरच्या पुनरागमनामुळे त्यांची फलंदाजीची बाजू अधिक भक्कम झाली आहे. संघात तळापर्यंत असलेली फलंदाजी आणि भक्कम फिरकी आक्रमण ही हैदराबादची सर्वाधिक जमेची बाजू आहे. सनरायजर्सने विजय शंकर, शाहबाझ नदीम आणि अभिषेक शर्मा यांना संघात घेऊन त्यांची बाजू अधिक भक्कम केली आहे. मात्र शिखर धवन दिल्लीकडे गेल्याचा परिणाम हैदराबादच्या सलामीवर कितपत होणार, त्यावर त्यांचे पुढील समीकरण अवलंबून राहणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्सचा संघ कर्णधार दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणार आहे. कार्तिकला भारतीय संघ व्यवस्थापनाचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी आयपीएल ही अत्यंत चांगली संधी आहे. तसेच कर्णधार असल्याने तो संघाला आणि त्याला आवश्यक वाटणाऱ्या कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीस येऊ शकत असल्याने तो स्वत:चे हित साधतानाच केकेआरला पुन्हा एकदा विजेता बनवण्यास उत्सुक आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली केकेआरने यापूर्वी दोन वेळा विजेतेपद पटकावले होते. मात्र गतवर्षी गंभीरकडून नेतृत्वाची धुरा स्वीकारल्यानंतर कार्तिक फारशी चमक दाखवू शकला नव्हता. केकेआरने यंदा संघात कार्लोस ब्रेथवेटसारख्या तडाखेबंद फलंदाजाचा समावेश केला आहे. त्यामुळे आंद्रे रसेल, सुनील नरेन यांच्यासह या तिसऱ्या विंडीज खेळाडूवर केकेआरच्या वाटचालीचे भवितव्य बऱ्याच प्रमाणात अवलंबून राहणार आहे. ख्रिस लीन, रॉबिन उथप्पा आणि शुभमन गिल यांच्यावर फलंदाजीची तर कुलदीप यादव, सुनील नरेन यांच्यावर गोलंदाजीची मदार राहणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स : दिनेश कार्तिक (कर्णधार), रॉबिन उथप्पा, ख्रिस लीन, शुभमन गिल, आंद्रे रसेल, कार्लोस ब्रेथवेट, सुनील नरेन, पीयूष चावला, कुलदीप यादव, निखिल नाईक, जोए डेन्ली, श्रीकांत मुंढे, नितीश राणा, संदीप वारियर, प्रसिध कृष्णा, लॉकी फग्र्युसन, हॅरी गुरने, के. सी. करीअप्पा, यारा पृथ्वीराज.

सनरायजर्स हैदराबाद : केन विल्यम्सन, मनीष पांडे, मार्टिन गप्टिल, रिकी भुई, डेव्हिड वॉर्नर, दीपक हुडा, मोहमद नबी, युसूफ पठाण, शाकिब अल हसन, अभिषेक शर्मा, विजय शंकर, श्रीवत्स गोस्वामी, जॉनी बेरिस्टो, रिद्धीमान साहा, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, भुवनेश्वर कुमार, राशिद खान, बॅसिल थम्पी, बिली स्टॅनलेक, टी. नटराजन, संदीप शर्मा, शाहबाझ नदीम.

सामन्याची वेळ: दुपारी ४ वा.