आज सनरायजर्स हैदराबादशी सामना; वॉर्नर-कोहली यांच्यातील द्वंद्वाकडे सर्वाचे लक्ष

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या १२व्या हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेला सनरायजर्सचा संघ रविवारी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुशी भिडणार आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बेंगळूरुला अद्याप आपले गुणांचे खाते उघडता आलेले नाही. परंतु हैदराबादमध्ये विजय मिळवणे बेंगळूरुसाठी सोपे नसेल. घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा आणि कडक ऊन या दोन्ही गोष्टी त्यांच्या विरोधात आहेत.

शुक्रवारच्या सामन्यानंतर ही खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल नसल्याचे हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नरने सांगितले. परंतु राजस्थान रॉयल्सच्या संजू सॅमसनने यंदाच्या ‘आयपीएल’मधील पहिले शतक झळकावून आपल्या फलंदाजीचा प्रत्यय घडवला.

दोन्ही सामन्यांत अपयशी ठरलेल्या बेंगळूरुच्या फलंदाजीने अधिक ताकदीनिशी उतरावे लागणार आहे. चेपॉक स्टेडियमवरील पहिल्या सामन्यात बेंगळूरुचा संघ ७० धावांत गारद झाला, तर गुरुवारी मुंबई इंडियन्सचे १८७ धावांचे लक्ष्य पेलण्यात ते अपयशी ठरले. त्यामुळे बेंगळूरुचा संघ कोहलीवर अवलंबून असल्याची टीका होत आहे. एबी डी’व्हिलियर्सने ४१ चेंडूंत ७० धावा केल्या, तर ३२ चेंडूत ४६ धावा काढणाऱ्या कोहलीला जसप्रीत बुमराने बाद केले. मात्र अन्य फलंदाजांकडूनही जबाबदारीने योगदान देण्याची आवश्यकता आहे.

हैदराबादची फलंदाजीची फळी मजबूत आहे. राजस्थानविरुद्ध वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी ११० धावांची दमदार सलामी नोंदवली. विजय शंकरने वेगवान ३५ धावा केल्या. मग रशीद खानने एक चौकार व षटकार मारून विजयावर शिक्कामोर्तब केले.

संघ

  • सनरायजर्स हैदराबाद : केन विल्यम्सन (कर्णधार), मनीष पांडे, मार्टिन गप्टिल, रिकी भुई, डेव्हिड वॉर्नर, दीपक हुडा, मोहमद नबी, युसूफ पठाण, शाकिब अल हसन, अभिषेक शर्मा, विजय शंकर, श्रीवत्स गोस्वामी, जॉनी बेरिस्टो, वृद्धिमान साहा, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, भुवनेश्वर कुमार, राशिद खान, बॅसिल थम्पी, बिली स्टॅनलेक, टी. नटराजन, संदीप शर्मा, शाहबाझ नदीम.
  • रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु : विराट कोहली (कर्णधार), एबी डी’व्हिलियर्स, पार्थिव पटेल (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉइनिस, शिम्रॉन हेटमायर, शिवम दुबे, नॅथन कोएल्टर-नाइल, वॉशिंग्टन सुंदर, उमेश यादव, यजुवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, हेन्रिच क्लासीन, मोईन अली, कॉलिन डी ग्रँडहोमी, पवन नेगी, टिम साऊदी, आकाशदीप नाथ, मिलिंद कुमार, देवदूत पडिक्कल, गुरकिराट सिंग, प्रयास राय बर्मन, कुलवंत केजरोलिया, नवदीप सैनी, हिम्मत सिंग.
  • सामन्याची वेळ : दुपारी ४ वा.
  • प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १.