२०१९ साली इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने न्यूझीलंडवर मात करत विजेतेपद पटकावले. मात्र मर्यादित षटके आणि सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिल्यामुळे इंग्लंडला अधिक चौकारांच्या निकषावर विजेता जाहीर करण्यात आले होते. ICC च्या या निर्णयावर नंतर टीकाही करण्यात आली. अखेरीस ICC ने तो वादग्रस्त नियम रद्द केला. सोमवारी ICC ने या संदर्भात पत्रक जाहीर करत माहिती दिली.

ICC च्या स्पर्धांमध्ये सामना अनिर्णित राहिल्यास सुपर ओव्हरमध्ये निकाल लावण्यात येण्याचा नियम कायम असणार आहे. मात्र साखळी फेरीत जर सुपर ओव्हरवर सामना अनिर्णित राहिला, तर तो अधिकृतरित्या अनिर्णित घोषित केला जाईल. पण बाद फेरीत सुपर ओव्हरमध्ये सामना अनिर्णित राहिला, तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर खेळवण्यात येईल, असा नवा नियम ICC ने केला. या नियमावर न्यूझीलंडचा फलंदाज जेम्स निशम याने खोचक प्रतिक्रिया दिली आहे. “बैठकीतील विषय – प्रवासी जहाजांवरील लोकांना चांगल्या आणि अधिक लांब टप्प्याच्या दुर्बिणी देणे” असे ट्विट त्याने केले आहे.

काही वर्षांपूर्वी टायटॅनिक नावाच्या मोठ्या प्रवासी जहाजाला हिमनगाला धडकल्याने जलसमाधी घ्यावी लागली. त्या अपघातात अनेक लोक मरण पावले. त्यामुळे आता दुर्बिणी देण्याचा फारसा उपयोग नाही. तसेच विश्वचषक करंडक तर न्यूझीलंडला गमवावा लागला आहे. आता हा नियम करून काय उपयोग असा अप्रत्यक्ष खोचक टोला जेम्स नीशमने लगावला.