क्रिकेटच्या खेळात रोज नवनव्या गोष्टी घडत असतात. कधी कोणी भन्नाट षटकार लगावतं, तर कधी कोणी अफलातून झेल टिपतं. कधी एखादा फलंदाज कमी चेंडूत तुफानी खेळी करून जातो, तर कधी एखादा गोलंदाज कमी धावा प्रतिस्पर्धी संघाच्या दांड्या गुल करतो. क्रिकेटमध्ये प्रत्येक नवीन गोष्ट थक्क करणारी असते. सध्या नुकताच असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर वाऱ्याच्या वेगाने पसरताना दिसतो आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा याने हा व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ कोणत्या ठिकाणचा आहे ते कळू शकलेले नाही. पण त्या व्हिडीओमध्ये गोलंदाज आणि फिल्डर यांनी एकत्रितपणे घेतलेला कॅच थक्क करणारा आहे. व्हिडीओमध्ये तो गोलंदाज जवळच उभ्या असलेल्या एका फिल्डरच्या डोक्यावरून चेंडू टोलवण्याचा प्रयत्न करतो. पण तो फिल्डर उडी मारून चेंडू थांबवण्यात यशस्वी होतो. पण चेंडू मात्र त्याच्या हाताला लागून उडतो. तो झेल सुटणार असे वाटत असतानाच गोलंदाज स्वत: पटकन उडी मारून झेल पकडतो.

या व्हिडीओमध्ये घेतलेला झेल इतका भन्नाट आहे की आकाश चोप्राने त्या झेलसाठी चक्क supercalifragilisticexpialidocious हा भलामोठा शब्द वापरला आहे. हा खरा शब्द नसून एका गाण्यामुळे हा शब्द प्रचलित झाला आहे. या शब्दाचा अर्थ अप्रतिम किंवा अतुलनीय असा आहे. त्यामुळे या भन्नाट कॅचसाठी आकाश चोप्राने खास हाच शब्द वापरला आहे.