क्रिकेटचे मैदान हे कायम अनिश्चित घटनांसाठी ओळखले जाते. क्रिकेटच्या सामन्यात केव्हा काय होईल याचा काहीही नेम नसतो. कधी एखादा फलंदाज सामना फिरवतो, कधी एखादा गोलंदाज हातात असलेला सामना सुमार कामगिरीमुळे गमावतो. तर काही वेळा फिल्डर एखादा झेल घेत सामन्यात आपला ठसा उमटवतो. असाच एक झेल ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या एका स्थानिक स्पर्धेत घेण्यात आला. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या मार्श कपमध्ये एका युवा खेळाडूने घेतलेल्या एका कॅचमुळे दर्शकांच्या डोळ्याचे पारणे फिटले.

मार्श कपमध्ये झालेल्या विक्टोरिया आणि दक्षिण ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात युवा खेळाडू कॅमरॉन वॅलेन्टी याने भन्नाट झेल पकडला. सामन्याच्या २८ व्या षटकात विक्टोरियाचा फलंदाज अॅरोन फिंच आणि पीटर हॅड्सकॉम्ब मैदानावर फलंदाजी करत होते. या दोन्ही फलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाला चांगलेच हैराण केले होते. त्याच वेळी षटकाच्या पाचव्या चेंडूवर वॅलेन्टीने जबरदस्त कामगिरी केली. दक्षिण आस्ट्रेलियाचा गोलंदज केन रिचर्डसन याने पीटर हॅड्सकॉम्बला अतिशय स्लो चेंडू टाकला. पीटरने ‘मिड-ऑफ’वरून फटका मारण्याचा प्रयत्न केला. वॅलेन्टी चेंडूपासून थोडा दूर होता, तरी हवेत उडी घेत त्याने भन्नाट झेल घेतला.

या झेलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एवढेच नाही तर वॅलेन्टीच्या झेलने त्याच्या संघालाही फायदा झाला.