रोमहर्षक अंतिम सामन्यात व्हेलॉसिटीवर चार गडी राखून मात

कर्णधार हरमनप्रीत कौरचे झुंजार अर्धशतक आणि राधा यादवने अखेरच्या षटकात केलेल्या उपयुक्त फटकेबाजीच्या जोरावर सुपरनोव्हाज संघाने महिलांच्या ट्वेन्टी-२० चॅलेंज क्रिकेट लीगमध्ये व्हेलॉसिटीवर चार गडी राखून रोमहर्षक विजयाची नोंद केली. सुपरनोव्हासचे हे सलग दुसरे विजेतेपद ठरले.

प्रथम फलंदाजी करताना सुषमा वर्मा (नाबाद ४०) आणि अमेलिया केर (३६) यांच्या संयमी फलंदाजीमुळे व्हेलॉसिटीने २० षटकांत ६ बाद १२१ धावा केल्या. अनुभवी मिताली राज (१२), डॅनियल व्हॅट (०) यावेळी अपयशी ठरल्या. सुपरनोव्हाससाठी ली ताहुहूने दोन, तर अनुजा पाटीलने एक बळी मिळवला.

प्रत्युत्तरात, हरमनप्रीतने ३७ चेंडूंत चार चौकार व तीन षटकारांसह ५१ धावांची खेळी साकारली. परंतु ती बाद झाल्यावर संघाची गाडी घसरली व सामना अखेरच्या षटकापर्यंत पोहोचला. शेवटच्या चेंडूवर एका धावेची गरज असताना राधाने चौकार लगावत सुपरनोव्हाजच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

संक्षिप्त धावफलक

व्हेलॉसिटी : २० षटकांत ६ बाद १२१ (सुष्मा वर्मा नाबाद ४०, अमेलिया कीर ३६; ली ताहुहू २/२१) पराभूत वि. सुपरनोव्हाज : २० षटकांत ६ बाद १२५ (हरमनप्रीत कौर ५१, प्रिया पुनिया २९; अमेलिया केर २/२९).

सामनावीर : हरमनप्रीत कौर.