भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंग्लंडमध्ये होणाऱ्या तिरंगी मालिके साठी भारतीय महिला संघ पाठवण्यास नकार दर्शवला आहे. या दौऱ्यातून माघार म्हणजे निष्काळजीपणा नाही. त्यामुळे ‘बीसीसीआय’च्या कटिबद्धतेवर शंका घेऊन मत प्रदर्शित करण्याआधी करोनाची परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत थांबावे, अशी विनंती ‘बीसीसीआय’च्या कार्यकारी समितीच्या सदस्या शांता रंगास्वामी यांनी केली आहे.

करोनाची वाढती संख्या लक्षात घेता बीसीसीआयने एकीकडे इंग्लंड दौऱ्यातून माघार घेतली असून दुसरीकडे अमिरातीमध्ये ‘आयपीएल’चे आयोजन करत आहे, अशी टीका ‘बीसीसीआय’वर होत आहे. मात्र शांता रंगास्वामी यांनी ही टीका फेटाळून लावली आहे. त्या म्हणाल्या, ‘‘हा निष्काळजीपणे घेतलेला निर्णय नाही. सामन्यासाठी तंदुरुस्ती मिळवण्यासाठी सहा आठवडे सराव करावा लागतो. करोनाचा विळखा सर्व राज्यांना बसला असून प्रशिक्षण शिबीर कुठे आयोजित करायचे, हा प्रश्न आहे. त्याचबरोबर इंग्लंडमध्ये १४ दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे.’’