राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या(आरसीए) निवडणुक निकाल जाहीर करण्याच्या संबंधित याचिका सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा राखीव ठेवली आहे.
बीसीसीआयने आजीवन बंदी घातलेले ललीत मोदी यांनी ही निवडणुक लढविल्यामुळे बीसीसीआय निकाल जाहीर केले जाऊ नयेत यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज (सोमवार) सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने येत्या ४ मार्च रोजी यावर सुनावणी दिली जाईल असे सांगत पुन्हा एकदा यावरील निर्णय राखीव ठेवला आहे.
बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, या निकालांत ललीत मोदीच बहुमताने निवडून येतील यात काहीच शंका नाही परंतु, नियमांनुसार त्यांच्यावर क्रिकेटमधील कोणत्याही प्रकारच्या हस्तक्षेपास घालण्यात आलेली बंदी या नियमाचे त्यामुळे उल्लंघन होईल. या कारणास्तव हा निकाल जाहीर केला जाऊ नये अशी भूमिका बीसीसीआयची आहे. तसेच ललीत मोदींच्या विरोधात उभे असलेले आर.पी.शर्मा देखील यांचाही निकाल जाहीर करण्याला विरोध आहे.
माजी आयपीएल अध्यक्ष ललीत मोदी यांनी राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी निवडणुक लढविली आहे. निवडणुकीतील ३३ मतांपैकी २६ मते ललील मोदींच्याच बाजूने असतील असेही बीसीसीआयचे म्हणणे आहे. परंतु, आयपीएलमधील वादग्रस्त राहीलेल्या ललीत मोदींवर आजीवन बंदी घालण्यात आल्यानंतरही मोदी पुन्हा राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होणे म्हणजे, बीसीसीआयच्या प्रतिष्ठेला आणि नियमांना डावळण्यासारखे ठरेल. असेही बीसीसीआयचे म्हणणे आहे.