इंडियन प्रीमिअर लीगच्या सहाव्या हंगामात झालेल्या गैरप्रकारांसंदर्भात तपासात बोर्डाचे अध्यक्ष म्हणून परस्परसंबंध नसल्याचे एन. श्रीनिवासन यांनी सिद्ध करावे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. बचावादरम्यान केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या नावाचा उल्लेख करण्याबाबतही न्यायालयाने हरकत घेतली.
परस्परविरोधी हितसंबंधांबाबत विभिन्न मतप्रवाह आहेत. तुम्हाला अशा स्वरूपाचे संबंध नसल्याचे सिद्ध करावे लागेल, असे खंडपीठाने श्रीनिवासन यांच्या वकिलांना सांगितले. न्यायाधीश मुदगल यांच्या अहवालात किंवा मुंबई उच्च न्यायालयाच्या कोणत्याही निर्णयात श्रीनिवासन यांचे परस्परविरोधी हितसंबंध असल्याचे स्पष्ट झाले नव्हते, असे श्रीनिवासन यांचे वकील कपिल सिब्बल यांनी सांगितले.
या खटल्यात प्रतिनिधित्व नसलेल्या जेटली यांच्या नावाचा तुम्ही वारंवार उल्लेख करीत आहात. ते या खटल्याशी संबंधित नाहीत. या खटल्याशी
संलग्न नसलेल्या व्यक्तीचे नाव घेऊ नका, असे न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर आणि एफ. एम. कलीफुला यांच्या खंडपीठाने श्रीनिवासन यांच्या वकिलांना सुनावले.
आयपीएलदरम्यान झालेल्या गैरप्रकाराचा तपास करण्यासाठी समितीची स्थापना जेटली यांच्या सूचनेनंतरच करण्यात आली होती. बीसीसीआयच्या हस्तक्षेपाशिवाय हा तपास व्हावा अशी जेटली यांची इच्छा होती, असा पवित्रा श्रीनिवासन यांचे वकील कपिल सिब्बल यांनी घेतला होता. मात्र खंडपीठाने जेटली यांच्या नावाचा उल्लेख करण्यास हरकत घेतली. त्यांचे नाव घ्यायचे असेल तर संदर्भही स्पष्ट करावा असे खंडपीठाने स्पष्ट केले.
धोनीबाबत श्रीनिवासन यांचे मौन
चेन्नई : भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची इंडिया सिमेंट्स कंपनीतील भूमिका नेमकी कोणती, या विषयावर बीसीसीआयचे पायउतार झालेले अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी मौन बाळगले. मात्र हितसंबंधाच्या मुद्दय़ावर चर्वितचर्वण सुरू असताना, धोनीला राजीनामा दे, असे मी का सांगू, असा सवालही श्रीनिवासन यांनी केला आहे. आयसीसीचे अध्यक्ष असलेल्या श्रीनिवासन यांनी आयपीएलमधील स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाबद्दल भाष्य करणे टाळले. स्पॉट-फिक्सिंगप्रकरणी मुदगल समितीच्या अहवालावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. ‘‘हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे मी त्यावर प्रतिक्रिया देणार नाही,’’ असे श्रीनिवासन यांनी सांगितले. चेन्नई सुपर किंग्जची मालकी असलेल्या इंडिया सिमेंट्स कंपनीचा धोनी हा पदाधिकारी असल्यामुळे या प्रकरणी श्रीनिवासन यांनी सावध पवित्रा घेतला.‘‘धोनीला राजीनामा द्यायला मी कशाला सांगू? धोनीच्या इंडिया सिमेंट्स कंपनीतील भूमिकेबाबत मी तुम्हाला का सांगू?’’ असे सांगत श्रीनिवासन यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला बगल दिली. स्पॉट-फिक्सिंग प्रकरणामुळे भारतीय क्रिकेटची प्रतिमा डागाळली आहे, हे मान्य करण्यास श्रीनिवासन यांनी नकार दिला.