एका सुप्रसिद्ध मासिकाच्या मुखपृष्ठावर छापण्यात आलेल्या वादग्रस्त जाहिरातीप्रकरणात भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला मोठा दिलासा मिळाला आहे. धोनी विरोधात फौजदारी कारवाई करण्यासंदर्भात दाखल करण्यात आलेली याचिका गुरूवारी सुप्रीम कोर्टाने रद्द केली. गेल्या वर्षभरापासून या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती. याआधी कोर्टाने धोनीवरील फौजदारी कारवाईला स्थगिती दिली होती. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीत कोर्टाने धोनीविरुद्धची याचिकाच रद्द ठरवली.

एका मासिकाच्या एप्रिल २०१३ च्या अंकामध्ये धोनीचे भगवान विष्णूच्या रुपातील छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. छायाचित्रात धोनीच्या हातांमध्ये विविध कंपन्यांची उत्पादने दाखविण्यात आली होती. त्यामध्ये एक बूटही दाखविण्यात आला होता. या जाहिरातीमुळे मोठा वाद निर्माण झाला. जाहिरातीतून धोनीने देशातील जनतेच्या धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार जयकुमार हिरेमठ या सामाजिक कार्यकर्त्याने अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांकडे केली होती. याची दखल घेऊन देवी-देवतांचा अवमान करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कलम २९५ अंतर्गत धोनीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. धोनीला न्यायालयात उपस्थित राहण्याचे समन्स देखील धाडण्यात आले होते. त्यानंतर धोनीने त्याविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.