News Flash

अध्यक्षपदासाठी श्रीनिवासन यांचे पाऊल पडते पुढे

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाच्या दिशेने एन. श्रीनिवासन यांचे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एक पाऊल पुढे पडले आहे.

| September 28, 2013 02:23 am

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाच्या दिशेने एन. श्रीनिवासन यांचे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एक पाऊल पुढे पडले आहे. श्रीनिवासन यांच्या विरोधात क्रिकेट असोसिएशन ऑफ बिहार (कॅब)ने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने श्रीनिवासन हे बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतात, त्याचबरोबर ते बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेलाही उपस्थित राहू शकतात, पण निवडणूक जिंकून आल्यावर मात्र त्यांना जोपर्यंत खटला चालू आहे, तोपर्यंत पदभार स्वीकारता येणार नाही, असे म्हटले आहे. त्यानुसार श्रीनिवासन यांना निवडणूक लढवण्याची मुभा सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली असून, त्यांनीही आपण निवडणूक लढवणारच, असे ठामपणे सांगितले आहे.
श्रीनिवासन यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवता येऊ नये, यासाठी कॅबने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने श्रीनिवासन हे निवडणूक लढवू शकतात, पण पदभार स्वीकारू शकत नाहीत, असा निर्णय दिला.
‘‘श्रीनिवासन हे जर अध्यक्षपदी निवडून आले तर ते सर्वोच्च न्यायालयाचा पुढील आदेश येईपर्यंत पदभार स्वीकारू शकत नाहीत,’’ असे न्यायाधीश ए. के. पाटनायक आणि जे. एस. केहर यांच्या पीठाने सांगितले.
स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात जावई गुरुनाथ मयप्पनवर आरोपपत्र दाखल करण्यात आले असले तरी श्रीनिवासन हे अध्यक्षपदाचा पदभार कसा सांभाळू शकतात, असा सवालही या वेळी सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला.

जिवे मारण्याची धमकी मिळाली असली तरीही मी लढणारच -आदित्य वर्मा
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या क्रिकेट असोसिएशन ऑफ बिहार (कॅब)चे सचिव आदित्य वर्मा यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. पण या धमकीला न जुमानता वर्मा यांनी यापुढेही लढण्याचा मानस व्यक्त केला आहे.
‘‘माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने मी ३०० टक्के आनंदी आहे. एन. श्रीनिवासन यांच्यासारख्या बलवान क्रीडा प्रशासकाच्या विरोधात मी एकटा उभा राहिलो आहे. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास आहे,’’ असे वर्मा यांनी सांगितले.
वर्मा यांनी या वेळी त्यांना गुरुवारी धमकीचा दूरध्वनी आल्याचे सांगितले. ते याबाबत पुढे म्हणाले की, गुरुवारी सायंकाळी ६ वाजून १६ मिनिटांनी मला जिवानिशी मारून टाकू, अशा आशयाचा धमकीचा दूरध्वनी आला. तुम्ही ही याचिका मागे घ्या, असे मला दूरध्वनीवरून धमकावण्यात आले, पण माझी लढाई ही सत्याची आहे.

निवडणूक लढवण्यापासून आणि बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्यापासून मला कुणीही रोखू शकत नाही. त्यावर माझे मत ऐकण्यापेक्षा कृपया सर्वोच्च न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवले आहे त्याकडे लक्ष द्या.
– एन. श्रीनिवासन.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2013 2:23 am

Web Title: supreme court says srinivasan can contest election
टॅग : N Srinivasan
Next Stories
1 शापित योद्धा! :बेन जॉन्सन
2 विश्व कनिष्ठ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा : नाशिकच्या विदितला ऐतिहासिक कांस्य
3 पटेल सचिवपदी कायम; रवी सावंत यांच्याबाबत प्रश्नचिन्ह
Just Now!
X