आयपीएल स्पॉट फिक्सींग प्रकरणात केरळ उच्च न्यायालयाकडून आजन्म बंदीची शिक्षा भोगत असलेल्या श्रीशांतच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांनी ५ फेब्रुवारीला योग्य खंडपीठासमोर श्रीशांतच्या याचिकेवर सुनावणी करण्याचे आदेश दिले आहेत. २०१३ साली गाजलेल्या आयपीएल स्पॉट फिक्सींग प्रकरणात श्रीशांतचं नाव समोर आलं होतं, यानंतर बीसीसीआयने श्रीशांतला आजन्म बंदीची शिक्षा सुनावली होती.

बीसीसीआयने घातलेल्या बंदीच्या शिक्षेवर श्रीशांतने सर्वप्रथम केरळ उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. ज्या याचिकेवर सुनावणी करताना केरळ उच्च न्यायालयाने श्रीशांतवरील बंदी उठवली होती. मात्र बीसीसीआयने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर केरळ उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने श्रीशांतवर पुन्हा एकदा बंदीची शिक्षा लादली. यानंतर श्रीशांतने केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला होता.