भारताचा डावखुरा फलंदाज आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाचं प्रतिनिधीत्व करणारा सुरेश रैना दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. २२ मार्चला सुरेश रैनाची पत्नी प्रियांकाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. चेन्नई सुपरकिंग्जने आपल्या ट्विटर हँडलवरुन ही आनंदाची बातमी दिली आहे.

गेली काही वर्ष सुरेश रैनाला भारतीय संघात स्थान मिळालेलं नाही. मात्र स्थानिक क्रिकेट आणि आयपीएलमध्ये तो अजुनही खेळतो आहे. २९ मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएलसाठी सुरेश रैनानेही जोरात तयारीही सुरु केली होती. मात्र देशभरात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे. यानंतर रैनासह महत्वाचे खेळाडू चेन्नईतला ट्रेनिंग कँप सोडत आपापल्या घरी गेले आहेत.

सुरेश रैनाने आतापर्यंत २२६ वन-डे, ७८ टी-२० आणि १८ कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. १७ जुलै २०१८ साली इंग्लंडविरुद्धचा वन-डे सामना हा रैनाचा अखेरचा आंतरराष्ट्रीय वन-डे सामना होता. यानंतर रैनाला भारतीय संघात स्थान मिळालेलं नाही.