एरवी आयपीएलच्या अंतिम फेरीच्या शर्यतीत असणारा चेन्नई सुपरकिंग्जचा संघ तेराव्या हंगामात पुरता ढेपाळला. महत्वाच्या खेळाडूंना झालेली दुखापत, खेळाडूंचा ढासळलेला फॉर्म, रैना-हरभजन यांची माघार अशा अनेक गोष्टींमुळे यंदा चेन्नईचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं. युएईत दाखल झालेल्या सुरेश रैनाने स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच स्पर्धेतून माघार घेत भारतात परतणं पसंत केलं. रैना आणि CSK च्या संघ व्यवस्थापनामध्ये काही बिनसल्याच्या बातम्याही यादरम्यान समोर आल्या होत्या. यानंतर CSK ने रैनाचा करार रद्द केल्याचंही समोर आलं. परंतू रैनाच्या अनुपस्थितीत संघाची झालेली वाताहात पाहता सोशल मीडियावर चाहते रैनाला पुनरागमन करण्यासाठी सांगत होते. अशातच रैनाने आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी देत आयपीएलचा आगामी हंगाम खेळणार असल्याचं स्पष्ट केलंय.

दैनिक जागरण वृत्तपत्राशी बोलत असताना सुरेश रैनाने आपण उत्तर प्रदेशकडून आगामी हंगामात स्थानिक क्रिकेट खेळणार असल्याचं सांगितलं. याव्यतिरीक्त आगामी आयपीएलमध्येही आपण सहभागी होत असल्याचं रैनाने स्पष्ट केलं. सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशच्या संघाने २०१५-१६ च्या हंगामाचं सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं.

अवश्य वाचा – IPL 2021 : १० संघांनिशी स्पर्धा अशक्य, आयोजनासाठी वेळ अत्यंत कमी – BCCI

महेंद्रसिंह धोनीसोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या रैनाने आयपीएलचा तेरावा हंगाम खेळला नाहीये. २०२१ साली मार्च ते मे या कालावधीत आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचं आयोजन करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. अशा परिस्थितीत रैना पुढील हंगामात चेन्नई संघाकडून पुन्हा मैदानात उतरणार की नवीन संघाचं प्रतिनिधीत्व करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – कमाईमध्येही धोनीच किंग ! IPL मधून आतापर्यंत कमावलेत कोट्यवधी रुपये, आकडा वाचून तुम्हीही व्हाल थक्क