मे महिन्यात इंग्लंडमध्ये सुरु होणारा विश्वचषक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेला असताना, भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोण येणार यावर शिक्कामोर्तब झालेलं नाहीये. मध्यंतरीच्या काळात कर्णधार विराट कोहलीला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्याबद्दल चर्चा सुरु होती. मात्र भारताचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाच्या मते, धोनी हा विश्वचषकासाठी चौथ्या क्रमांकावर येण्यास योग्य पर्याय आहे. तो ‘हिंदुस्थान टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

“सध्या धोनी चांगली फलंदाजी करतोय, त्यामुळे माझ्यासाठी विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी धोनी हाच एक योग्य पर्याय आहे. ज्या पद्धतीने त्याने ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड दौऱ्यात धावा काढल्या आहेत, ज्या पद्धतीने तो नवोदीत गोलंदाजांना मार्गदर्शन करतोय हे सर्व संघासाठी महत्वाचं आहे. दोन विश्वचषक आणि आयपीएलमध्ये खेळण्याचा अनुभव असलेला धोनी हा विराटसाठी महत्वाचा खेळाडू ठरु शकतो.” सुरेश रैनाने महेंद्रसिंह धोनीचं कौतुक केलं.

विश्वचषकाआधी भारतीय संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन टी-20 आणि पाच वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. विश्वचषकाआधी भारतीय संघाचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय दौरा असणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत धोनीच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – विराट चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो !