भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन मुद्दे सध्या प्रचंड चर्चेत आहेत. आधी चेन्नईच्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला करोनाची लागण झाली. त्यानंतर रैनाने IPL 2020मधून माघार घेतली. दोन दिवसांनी त्याच्या माघारीमागे धोनी आणि त्याच्यातील वाद कारणीभूत असल्याचे CSKचे मालक एन श्रीनिवासन यांनी सांगितलं. नंतर त्यांनीच त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगितले. आता अखेर रैनानेच या मुद्द्यावर मौन सोडलं.

हॉटेल रूमवरून धोनीसोबतच्या वादावर…

“धोनी आणि माझ्यात रूमवरून वाद झाला ही बाब खोटी असून कोणीतरी अफवा पसरवत आहे. जे लोक मला ओळखतात त्यांना माझा स्वभाव माहिती आहे. पण ज्यांना वाटतं की CSK आणि मला यश मिळू नये अशा लोकांनी अशा वावड्या मुद्दाम उठवल्या आहेत आणि अशा गोष्ट मुद्दाम रंगवून सांगितल्या जात आहेत”, असे रैनाने एनडीटिव्हीशी बोलताना स्पष्ट केलं.

सुरेश रैनाचं CSKबाबत मोठं वक्तव्य, म्हणाला…

CSKचे मालक एन श्रीनिवासन यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर…

“श्रीनिवासन हे मला माझ्या वडिलांप्रमाणे आहे. कठीण प्रसंगात नेहमी त्यांनी मला पाठिंबा दिला आहे. ते मला त्यांच्या धाकट्या मुलासारखं मानतात. मला खात्री आहे की त्यांच्या मुलाखतीतील काही वक्तव्य चुकीच्या पद्धतीने वळवली गेली असतील. माझ्या माघारीचे कारण त्यांना सुरूवातीला माहिती नव्हते, पण आता मात्र सारं सुरळीत झालं आहे”, असं रैना म्हणाला.

CSKबाबत बोलताना रैना म्हणाला…

“CSK माझं कुटुंब आहे. धोनी माझ्यासाठी खूप जवळची आणि महत्त्वाची व्यक्ती आहे. त्यामुळे माझ्यासाठी माघारीचा निर्णय खूप कठीण होता. पण माझ्यात आणि CSKमध्ये कोणताही वादविवाद नाही, हे मी स्पष्ट करू इच्छितो. मी सध्या इथे क्वारंटाइन असलो तरीही माझा क्रिकेटचा सराव सुरू आहे. कुणी सांगावं… कदाचित मी तुम्हाला पुन्हा एकदा CSKच्या कॅम्पमध्येही दिसेन”, असे रैनाने सांगितलं.