चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) अनुभवी फलंदाज सुरेश रैनाने आयपीएल 2021साठी तयारी सुरू केली आहे. रैना सीएसके कॅम्पमध्ये सामील झालेला नसला तरी त्याने गाझियाबाद येथे प्रशिक्षण सुरू केले आहे. सीएसकेची जर्सी घालून तो बुधवारी सरावासाठी मैदानात उतरला. रैनाच्या या प्रशिक्षणाचा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्जच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे.

या सराव सत्रादरम्यान रैनाने उंच फटके खेळले. 30 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये रैना आपले ट्रेडमार्क फटकेही खेळला. या व्हिडिओतून तो चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. त्याने स्वत: हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. आयपीएलच्या आगामी हंगामासाठी मी पूर्णपणे तयार आहे, असे रैनाने या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले.

 

सुरेश रैना 24 मार्चनंतर संघात सामील होणार

रैना 21 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्जच्या शिबिरात सामील होणार होता, पण तो आता 24 मार्चनंतर सीएसकेच्या शिबिरात सामील होईल. चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ यांनी एका क्रीडा वृत्तसंस्थेशी बातचीत केली. ते म्हणाले, ”रैना काही वैयक्तिक काम आहे. काम संपविल्यानंतर तो संघात सामील होईल. 24 मार्चनंतर तो शिबिरात सामील होईल, असे त्याने आम्हाला सांगितले आहे.

वैयक्तिक कारणास्तव रैना आयपीएल 2020मध्ये सहभागी झाला नाही. याचा परिणाम चेन्नई सुपर किंग्जच्या कामगिरीवर स्पष्टपणे दिसून आला. मागील हंगामात संघाला चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे रैनाच्या आगमनामुळे यावेळी संघाची फलंदाजी अधिक बळकट होईल.